कोकणच्या सीबीडी-बेलापूर विभागाच्या उपायुक्तासह तिघांना अटक
खाजगी व्यक्तीमार्फत पाच लाख रुपयांची लाच घेताना कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 जानेवारी 2026
मुंबई, – कोकनच्या सीबीडी बेलापूर विभागाचे उपायुक्त अनिल सुधाकर टाकसाळे यांच्यासह खाजगी व्यक्ती साईप्रतिम माधव अमीन आणि राजा गणेश थेवर अशा तिघांना पाच लाख रुपयांच्या लाचप्रकरणी ठाणे युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांत मदत करण्यासाठी, भविष्यात कारवाई करु नये म्हणून अनिल टाकसाळे यांनी खाजगी व्यक्तीमार्फत तक्रारदार व्यावसायिकाकडून गुडलक म्हणून पाच लाख तर दरमाह दिड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी पाच लाखांच्या गुडलकची रक्कम घेताना सोमवारी ही कारवाई करण्यात आली आहे. उपायुक्त दर्जाच्या अधिकार्याला लाचप्रकरणी अटक झाल्याने पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. अटकेनंतर या तिघांनाही मंगळवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
यातील तक्रारदार व्यावसायिक असून त्यांची आई एकविरा ट्रेडिंग नावाची एक खाजगी कंपनी आहे. ही कंपनी तांदूळ विक्री व्यवसायात असून त्यांच्यासोबत कंपनीत त्यांचे दोन पार्टनर आहेत. 30 डिसेंबर 2025 रोजी अनिल टाकसाळे यांनी त्यांच्या कंपनीच्या गोदामावर अचानक भेट दिली होती. त्यात त्यांच्या गोदामात अवैध तांदूळाचा साठा सापडला होता. त्यामुळे तक्रारदारासह त्यांच्या दोन्ही पार्टनरविरुद्ध भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3, 7 आणि भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी मदत करणे, भविष्यात त्यांच्यासह त्यांच्या पार्टनरवर केस न करण्यासाठी तसेच तांदूळ खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी अनिल टाकसाळे यांनी त्यांच्या खाजगी कामासाठी नेमलेल्या व्यक्ती साई यांच्यामार्फत तक्रारदाराकडे गुडलक म्हणून पाच लाख आणि दरमाह दोन लाखांचा हप्ता देण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी त्यांना गुडलक म्हणून पाच लाख रुपये आणि दरमाह दोनऐवजी दिड लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अनिल टाकसाळे यांच्यासह त्यांच्यासाठी काम करणार्या साई याच्याविरुद्ध तक्रार केली होती.
5 जानेवारी तक्रार प्राप्त होताच त्याची दोन दिवसांनी या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करण्यात आली होती. यावेळी खाजगी व्यक्ती साई याने अनिल टाकसाळे व त्यांच्या पार्टनरवर कारवाई न करण्यासाठी, भविष्यात त्यांना मदत करण्यासाठी गुडलक म्हणून पाच लाख आणि दरमाह दिड लाखांचा हप्ता स्विकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर या अधिकार्यांनी सोमवारी सीबीडी-बेलापूर येथील सेक्टर पाख हॉटैल लक्ष्मी हॉटेलजवळ सापळा लावला होता. यावेळी अनिल टाकसाळे यांच्या वतीने साईप्रितम अमीन आणिण राजा थेवर यांनी लाचेची रक्कम घेतली होती.
याच दरम्यान तिथे सापळा लावलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी दोन्ही खाजगी व्यक्तींना लाचेच्या रक्कमेसह अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांनी ती लाच अनिल टाकसाळे यांच्या वतीने घेतल्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्यांनाही या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या तिघांविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7, 7 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.