चित्रपट निर्मितीसाठी मदतीच्या नावाने दिपक तिजोरीची फसवणुक
दोन महिलांसह तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 जानेवारी 2026
मुंबई, – आगामी चित्रपटाच्या निर्मितीसाठी अर्थसहाय्य मिळवून देण्याच्या नावाने बॉलीवूडचे अभिनेते, निर्माता-दिग्दर्शक दिपक तिजोरी यांची दोन महिलांसह तिघांनी फसवणुक केल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कविता शिबाग कूपर, फौजिया आरशी व अन्य एका व्यक्तीविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. फसवणुकीसाठी या तिघांनी टी सिरीजसह झी नेटवर्क आदी नामांकित कंपनीच्या नावाने व्यवहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
दिपक तुलशीदास तिजोरी हे गोरेगाव येथील लिंक रोड, गार्डन इस्टेट अपार्टमेंटमध्ये राहतात. बॉलीवूडमध्ये दिपक हे अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक म्हणून परिचित आहेत. 1990 सालापासून ते बॉलीवूडमध्ये काम करत असून त्यांचा पहिला आशिकी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर त्यांनी अनेक निर्माता-दिग्दर्शकांसोबत काम केले होते. चित्रपटात काम करताना त्यांनी काही चित्रपटांमध्ये निर्माता-दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. त्यातून त्यांची बॉलीवूडशी संबंधित अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यासोबत चांगली ओळख आहे. त्यांच्याशी मैत्रीचे संबंध आहेत.
डिसेंबर 2024 रोजी त्यांनी टॉम डिक अॅण्ड मेरी या हिंदी चित्रपटाचे लिखान सुरु केले होते. त्यांना या चित्रपटाचे निर्मितीसह दिग्दर्शन करायचे होते. चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांना अर्थसहाय्य हवे होते. याच दरम्यान त्यांच्या एका मित्राने त्यांना कविता कपूरविषयी माहिती दिली होती. कविता ही टी सिरीज या म्युझिक कंपनीत कामाला होती. त्यामुळे त्यांनी कविताची भेट घेऊन तिला त्यांच्या चित्रपटाविषयी माहिती दिली होती. यावेळी तिने तिची झी नेटवर्क आणि मिडीया इंडस्ट्रीमध्ये चांगली ओळख आहे. त्यांच्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसांनी त्यांना कविताने टी सिरीजची नोकरी सोडल्याचे समजले.
फेब्रुवारी 2025 रोजी कविताने त्यांची ओळख फौजिया आरशीशी करुन दिली होती. तिची पहिली भेट फौजियाच्या ओशिवरा येथील घरी झाली होती. तिने फौजिया ही चित्रपट निर्मात्या असून ती लवकरच एक एअरलाईन कंपनी सुरु करणार असल्याचे सांगितले. तिचे झी नेटवर्कशी चांगले संबध आहे. या कंपनीकडून त्यांना लेटर ऑफ इंटरेस्ट मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी आधी अडीच लाख आणि नंतर अडीच लाख असे पाच लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
झी नेटवर्क ही एक नामांकित मनोरंजन कंपनी असल्याने कंपनीकडून लेटर मिळाल्यास त्यांना त्यांच्या चित्रपटासाठी चांगले फायनासर मिळणार होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी कंपनीच्या जोशी नावाच्या एका व्यक्तीशी त्यांचे बोलणे करुन दिले होते. त्यामुळे दिपक तिजोरी यांना त्यांच्यावर विश्वास बसला होता. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना अडीच लाख रुपयांचे पहिले पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर त्यांनी त्यांना एका आठवड्यात लेटर देण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत त्यांच्यात एक करार झाला होता.
मात्र पेमेंट करुनही त्यांनी त्यांना लेटर दिले नाही. विचारणा केल्यानंतर कविता आणि फौजिया त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी कंपनीतील जोशी नावाच्या व्यक्तीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी झी नेटवर्कमध्ये जोशी नावाचा कोणीही अधिकारी काम करत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. या दोघांनी टी सिरीज आणि झी नेटवर्कच्या माध्यमातून त्यांना लेटर ऑफ इंटरेस्ट देण्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच दिपक तिजोरी यांनी बांगुरनगर पोलीस ठाण्यात संबंधित तिघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर कविता कपूर, फौजिया आरशीसह अन्य एका व्यक्तीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही महिलांसह त्यांच्या तिसर्या सहकार्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.