व्यावसायिक वादातून मालकाला दोन कोटीच्या खंडणीसाठी धमकी
माजी संचालकाविरुद्ध खंडणीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 जानेवारी 2026
मुंबई, – व्यावसायिक वादातून कंपनीच्या मालकाच माजी संचालकाने दोन कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार डोंगरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी माजी संचालक असलेल्या प्रभाकरनाथ सुभाषचंद्र मिश्रा याच्याविरुद्ध डोंगरी पोलिसांनी चोरीसह अपहार, फसवणुक आणि खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांचा तपास सुरु असून प्रभाकरनाथ मिश्राची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले.
मोहम्मद फारुख हनीफ शेख हे व्यावसायिक असून त्यांचा गार्मेट एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत डोंगरी परिसरात राहतात. त्यांची नवहुश मर्कटाइल प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक खाजगी कंपनी असून कंपनीत ते प्रवर्तक आहे. जानेवारी 2025 रोजी त्यांनी कंपनीत प्रभाकरनाथ याची संचालक म्हणून नियुक्ती केली होती. त्यासाठी त्यांना दरमाह 25 हजार रुपयांचे वेतन दिले जात होते. दहा महिन्यांत त्याने कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्याच्या जागी आकाश कौशिक पवारयांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आलीद होती. कंपनीत असताना प्रभाकरनाथने कंपनीची एक बोगस चावी बनवून घेतली होती.
नोव्हेंबर 2025 रोजी त्याने कंपनीतील महत्त्वाचे दस्तावेज, बँकेचे धनादेश, दोन डेस्कटॉप, एक लॅपटॉप, प्रिंटर आदी मुद्देमालाची चोरी केली होती. कंपनीच्या एका संचालकाच्या मदतीने त्याने कंपनीच्या काळबादेवी येथील बॅकेतून संचालकपदी कार्यरत नसताना ते संचालक असल्याचे सांगून कंपनीच्या लेटरहेडवर स्वाक्षरी करुन सुमारे 33 लाख रुपयांचा अपहार केला होता. ही रक्कम त्याने स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. कंपनीच्या सात कोटीचा निधी बेकायदेशीरपणे गोठवला. कंपनीच्या लेटरहेडवर चेकबुक हरविल्याचे कारण सांगून दोन्ही संचालक प्रत्यक्षात उपस्थित राहत नाही तोपर्यंत कंपनीचा निधी कोणालाही वापरु देऊ नये असे बँकेला सांगितले होते.
हा प्रकार मोहम्मद फारुख शेख यांना समजताच त्यांनी त्याला त्यांच्या वाद मिटविण्यासाठी कॉल केला होता. यावेळी त्याने त्यांच्याकडे दोन कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. दोन कोटी रुपये दिले नाहीतर गोठविलेले बँक खाते अनफ्रिज करणार नाही. इतकेच नव्हे तर त्यांना बोरिवली येथे बोलावून गुंडाकरवी धमकी देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. समझौता करण्याची तयारी दर्शवून मोहम्मद फारुख त्यांच्या तावडीतून निसटले होते. या प्रकारानंतर त्यांनी कंपनीच्या वतीने त्यांना तीन कायदेशीर नोटीस पाठविली होती, मात्र त्यांनी एकाही नोटीसला उत्तर दिले नाही.
प्रभाकरनाथने बँक खाते गोठविल्यानंतर कंपनीला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागत होते. त्यांचे पोर्ट आणि डिटेन्शन चार्जेस वाढत होते. क्लायंटला पैसे देता येत नसल्याने मार्केटमध्ये कंपनीची प्रचंड बदनामी झाली होती. या प्रकारानंतर त्यांनी डोंगरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रभाकरनाथ मिश्रा याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीसह अपहार, फसवणुक, खंडणीसाठी धमकी देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंतच्या प्राथमिक तपासात व्यावसायिक वादातून हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याला लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.