ड्रग्ज पार्सलच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टच्या नावाने वयोवृद्धाला गंडा
40 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 जानेवारी 2026
मुंबई, – ड्रग्ज पार्सलच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टची भीती दाखवून एका वयोवृद्धाची चारजणांच्या टोळीने सुमारे 40 लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चारही आरोपीविरुद्ध पूर्व प्रादेशिक सायबर सेल विभागाने फसवणुकीसह आयटी कलमांर्तत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
70 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार अंबिका प्रसाद कौशिक हे मुलुंडच्या सर्वोदयनगर परिसरात एकटेच राहत असून सध्या नोकरीतून निवृत्त झाले आहेत. त्यांचे दोन्ही मुले अमेरिकेत राहतात. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत ते त्यांच्या घरी होते, यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो ब्ल्यू डार्ट कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांनी बँकाँक येथे त्यांच्या आधारकार्डचा वापर करुन एक पार्सल पाठविले आहे. ते पार्सल कस्टम अधिकार्यांनी ताब्यात घेतले आहे. त्यात काही आक्षेपार्ह वस्तू सापडल्या असून याबाबत कस्टम अधिकार्याकडून चौकशी सुरु आहे.
या चौकशीसाठी त्यांचा कॉल सायबर ब्रॅचचा जोडून देत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्याशी अमीत नावाच्या एका व्यक्तीने संभाषण सुरु केले. त्यांच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले असून ड्रग्जचा व्यवसाय नवाब मलिक चालवत आहे. नवाब मलिक हा आमदार असून याबाबत कोणाशी चर्चा करु नका. त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे असे सांगितले. यावेळी त्यांनी बँकाँकला कुठलेही पार्सल पाठविले नाही, नवाब मलिक नावाच्या कुठल्याही आमदाराला आपण ओळखत नाही असे सांगितले. तरीही तो त्यांना धमकावून त्यांना जेल होऊ शकते असे सांगत होता.
त्याने त्यांच्या कुटुंबियांसह बँक खात्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे प्रचंड पैसे असून ते पैसे कोठून आले असे विविध प्रश्न विचारुन त्यांना डिजीटल अरेस्ट केल्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडता येणार नाही, कोणालाही संपर्क साधता येणार नाही. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांवर नजर आहे असे सांगून त्यांना घाबरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या व्यक्तीने त्यांना त्यांच्या बँक खात्यातील रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते.
चौकशीनंतर त्यांची रक्कम परत पाठविण्यात येईल असे सांगितले. डिजीटल अरेस्टसह ड्रग्जच्या गुन्ह्यांत अटक करुन जेलमध्ये पाठविण्यात येईल अशी धमकी मिळाल्याने ते प्रचंड घाबरले होते. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यात 40 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. काही दिवसांनी त्याने त्यांना पुन्हा कॉल करुन चौकशी र्पू झाली आहे. त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार नाही. प्रकरण मिटले असून त्यांनी जमा केलेली रक्कम दोन टक्के कापून पुन्हा त्यांच्या बँक खात्यात पाठविण्याचे आश्वासन दिले. मात्र दोन दिवसांत त्याने त्यांची रक्कम ट्रान्स्फर केली नाही. त्याला कॉल केल्यानंतर त्याने त्याला प्रतिसाद दिला नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घडलेला स्थानिक पोलिसांसह पूर्व सायबर सेल पोलिसांना सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर चार अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.