फ्लॅटच्या आमिषाने दोन वयोवृद्ध बंधूंची 90 लाखांची फसवणुक

दाऊद इब्राहिमची धमकी देणार्‍या विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 जानेवारी 2026
मुंबई, – फ्लॅटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने दोन वयोवृद्ध बंधूंची दोन विकासकांनी सुमारे 90 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार नागपाडा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्कायहाय रिलेटर्स अ‍ॅण्ड डेव्हलोपर कंपनीशी संबंधित दोन्ही विकासकाविरुद्ध नागपाडा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जाफर माजीद सिद्धीकी आणि अब्दुल करीम माजिद खान अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी बारा वर्षांत इमारतीचे बांधकाम केले नाही, याबाबत विचारणा केल्यानंतर या दोघांन तक्रारदार बंधूंना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

65 वर्षाचे वयोवृद्ध तक्रारदार सिराज इब्राहिम सोपारीवाला हे त्यांच्या कुटुंबियांसोबत आग्रीपाडा परिसरात राहत असून त्यांचा इंपोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय आहेत. चौदा वर्षांपूर्वी त्यांच्यासह त्यांचा भाऊ सोहिल इब्राहिम सोपारीवाला यांना प्रॉपटीमध्ये गुंतवणुक करायची होती. यावेळी त्यांच्या परिचित जाफर आणि अब्दुल यांनी त्यांच्या स्काय हाय प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला होता. या प्रोजेक्टमध्ये टू बीएचके फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष दाखविले होते. या फ्लॅट खरेदीमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना भविष्यात चांगला फायदा होईल असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट खरेदीवर गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. या दोघांनी त्यांना 705 चौ. फुटाचा फ्लॅट 64 लाख 50 हजार तर 595 चौ फुटाचा फ्लॅट 54 लाख 44 हजारांना देण्याचे आश्वासन दिले होते.

त्यांनी त्यांना क्युबा पॅलेस इमारतीच्या दोन फ्लॅटसाठी कॅश आणि धनादेशाद्वारे टप्याटप्याने 90 लाख 14 हजार 500 रुपये दिले होते. यावेळी त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा एक करार झाला होता. त्यात त्यांना क्यूबा पॅलेस इमारतीच्या 22 व्या मजल्यावर दोन फ्लॅट देण्याचे नमूद करण्यात आले होते. यावेळी त्यांनी त्यांना स्कायहाय रिलेटर्स अ‍ॅण्ड डेव्हलोपर या कंपनीच्या लेटरहेडवर अलोटमेंट दिले होते. या इमारतीचे बांधकाम 2014 रोजी पूर्ण होणार होते. मात्र त्यांनी दिलेल्या मुदतीत इमारतीचे बांधकाम पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे विचारणा सुरु केली होती. यावेळी ते दोघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्यातील फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार रद्द केला आणि त्यांच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती.

यावेळी त्यांनी इमारतीला लागणार्‍या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या असून इमारतीचे बांधकाम लवकरच सुरु होणार असल्याचे सांगितले. मात्र 2023 पर्यंत इमारतीचे बांधकाम पूर्ण केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी जाफर सिद्धीकी आणि अब्दुल खान यांनी त्यांना शिवीगाळ करुन ते दोघेही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबधित तसेच नागपाडा पोलीस ठाण्यातील सर्वच पोलीस अधिकारी आपल्या परिचित असल्याचे सांगितले. त्यांनी फ्लॅटसाठी दिलेले पैसे देणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा अशी धमकी देऊन पिटाळून लावले होते.

या धमकीनंतर त्यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जाफर सिद्धीकी आणि अब्दुल खान या दोन्ही विकासकाविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. दोन्ही आरोपींनी धमकी देण्यासाठी दाऊद इब्राहिमच्या नावाचा उल्लेख केल्याने त्याची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page