महागड्या स्पोर्टस बाईक चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश
अठरा लाखांच्या बाईकसह त्रिकुटाला अटक तर नऊ गुन्हे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 जानेवारी 2026
मुंबई, – मुंबई शहरात विविध ठिकाणी पार्क केलेल्या महागड्या स्पोर्टस बाईक चोरी करणार्या एका टोळीचा अंधेरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी अठरा लाख रुपयांच्या नऊ स्पोर्टस बाईक हस्तगत केल्या आहेत. ओमकार सुनिल फासगे, सागर राहुल गायकवाड आणि कार्तिक विष्णू म्हस्के अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांच्या अटकेने नऊ बाईक चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहेत. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यातील तक्रारदारांनी त्यांची अंधेरी येथे पार्क केलेली महागडी स्पोर्टस बाईक चोरीस गेल्याची तक्रार केली होती. 13 जानेवारीला त्यांनी अंधेरीतील महानगरपालिकाजवळील गुंदवली येथे त्यांची बाईक पार्क केली होती. रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने ती बाईक चोरी करुन पलायन केले होते. त्यांच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बाईक चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही दिवसांत मुंबई शहरात महागड्या बाईक चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा बाईक चोर आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून सर्वच पोलीस ठाण्यांना देण्यात आले होते.
या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किशोर परकाळे, सहाय्यक फौजदार राजेंद्र पेडणेकर, पोलीस हवालदार संदीप शिंदे, हनुमंत पुजारी, राहुल घडवले, पोलीस शिपाई विवेक म्हात्रे, विजयानंद लोंढे, विजय पाटील, विजय मोरे, तांत्रिक तपासात मदत करणारे पोलीस हवालदार विशाल पिसाळ यांनी संबंधित गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील काही आरोपी साकिनाका येथील संघर्षनगर परिसरत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून ओमकार फासगे, सागर गायकवाड आणि कार्तिक म्हस्के या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीतून ते तिघेही महागड्या स्पोर्टस बाईक चोरी करणारे सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले.
त्यांच्या अटकेने अंधेरी, विलेपार्ले, खारघर, अॅण्टॉप हिल, भांडुप, काळाचौकी, घाटकोपर पोलीस ठाण्यातील नऊ बाईक चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांतील नऊ चोरीच्या स्पोर्टस बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या असून त्याची किंमत सुमारे अठरा लाख रुपये आहेत. तपासात आलेल्या या माहितीनंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.