मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 जानेवारी 2026
मुंबई, – सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील एका दुकलीस एमएचबी पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 24 तासांत शिताफीने अटक केली. संजीव मुरलीधर गुप्ता आणि राजनारायण छोटेलाल शर्मा अशी या दोघांची नावे असून ते दोघेही दहिसरचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील रिक्षा हस्तगत केली असून गुन्ह्यांतील मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दोन्ही आरोपी रिक्षातून रेकी करुन सोनसाखळी चोरी करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
वासंती रामकृष्णन अय्यर ही 70 वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार बोरिवलीतील शांती आश्रम डेपोजवळील पंजायतन सोसायटीमध्ये राहते. बुधवारी 21 जानेवारीला ती तिच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एलआयसी कॉलनी, जयगुरुदेव भवन सहकारी सोसायटीच्या आयप्पा मंदिरात दर्शनासाठी गेली होती. सायंकाळी पावणेआठ वाजता गेटमधून आत प्रवेश करताना अचानक तिथे एक रिक्षा आली. काही कळण्यापूर्वीच रिक्षातून एक तरुण उतरला आणि त्याने तिच्या गळ्यातील एक लाखांची 25 ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरी करुन त्याचा सहकारी रिक्षाचालकासोबत पळून गेला होता. घडलेला प्रकार वासंती अय्यरने एमएचबी पोलिसांना सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी पळून गेलेल्या दोघांविरुद्ध सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष धनवटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिश गवळी, पोलीस निरीक्षक सुरसे, अतुल आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तोरगल, भालचंद्र शिंदे, लक्ष्मण वडरे, गणेश तारगे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश किरपेकर, अतुल वाघोले, इंद्रजीत पाटील, पोलीस शिपाई योगेश मोरे, सचिन मंजुळे यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी संजीव गुप्ता आणि राजनारायण शर्मा या दोघांनाही दहिसर येथून ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांत त्यांनी वापरलेली रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. गुन्ह्यांतील सोनसाखळी लवकरच त्यांच्याकडून हस्तगत केली जाणार आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 24 तासांत दोन्ही आरोपींना अटक करणार्या पोलीस पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.