गुंतवणुकीसाठी घेतलेल्या पाच कोटीचा अपहारासह तिघांची फसवणुक

एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 जानेवारी 2026
मुंबई, – गुंंतवणुकीसाठी घेतलेल्या सत्तर लाख रुपयांच्या कॅशसहीत चार कोटी चाळीस लाख रुपयांच्या साडेचार किलो सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन एका व्यावसायिकासह त्याच्या दोन मित्रांची त्यांच्याच परिचित कुटुंबातील चार सदस्यांनी फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील चारही आरोपीविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणकीचा गुन्हा दाखल केला आहे. नितेश शांतीलाल मेहता, मुक्ता नितेश मेहता, शांतीलाल मेहता आणि भरतभाई जैन अशी या चौघांची नावे असून यातील नितेश हा या कटातील मुख्य आरोपी आहे. नितेशने या तिघांसह इतर काही लोकांकडून गुंतवणुकीसाठी पैसे घेऊन त्यांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विश्वमणी मातामणी तिवारी हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवली परिसरात राहतात. त्यांची प्रभात ग्रुप ऑफ कंपनीज नावाने अनेक कंपन्या आहेत. या कंपनीचे मुख्य कार्यालय बोरिवलीतील राजेंद्रनगर परिसरात आहे. तीन वर्षांपूर्वी ते कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात राहत होते. तिथेच त्यांची नितेश मेहताशी ओळख झाली होती. नितेश हा ज्वेलर्स व्यापारी असून त्याचे कांदिवली येथे मोनिका ज्वेलर्स नावाचे एक शॉप आहे. अनेकदा ते त्याच्या शॉपमधून ज्वेलरी खरेदी करत होते. त्यातून त्यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. जानेवारी 2023 रोजी नितेशने त्यांना त्यांच्या शॉपमध्ये बोलाविले होते. यावेळी त्याने त्यांना ते एमसीएक्स ट्रेडिंग साईटवरुन सोने, चांदी आणि हिर्‍यांचे ट्रेडिंग करतात. त्यात त्यांनी लाखो रुपयांची गुंतवणुक केली असून त्यांना चांगला परतावा मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्यामार्फत गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला फायदा होईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता.

सोने आणि रोख रक्कम गुंतवणुकीवर त्यांना चाळीस टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. ही माहिती विश्वमणी तिवारी यांनी त्यांचे मित्र पराग मालदे आणि कमल पारेख यांना सांगून त्यांनाही नितेश मेहताकडे गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते दोघेही गुंतवणुकीसाठी तयार झाले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याकडे काही रक्कम तसेच सोने गुंतवणुकीसाठी दिले होते. या गुंतवणुकीवर नितेशने त्यांना चांगला परतावा दिला होता. त्यामुळे त्यांना नितेशवर विश्वास बसला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे आणखीन काही रक्कमेसह सोने गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे पराग मालदे आणि कमल पारेख यांनी पन्नास लाख तर विश्वमणी तिवारी यांनी वीस लाखांची कॅश तसेच त्यांच्या पत्नीचे चार कोटी चाळीस लाख रुपयांचे साडेचार किलो सोने असे पाच कोटी दहा लाख रुपयांचे कॅश आणि सोने नितेशला गुंतवणुकीसाठी दिले होते.

मात्र या गुंतवणुकीवर त्याने त्यांना कुठलाही परतावा दिला नाही. विचारणा केल्यानंतर नितेश व त्याचे वडिल शांतीलाल मेहता हे दोघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान विश्वमणी तिवारी यांना त्यांच्या काही मित्रांनी नितेशकडे लाखो रुपयांची गुंतवणुक केल्याचे समजले होते. मात्र नितेशने कोणालाही गुंतवणुकीवर परतावा दिला नाही किंवा त्यांची गुंतवणुक केलेली मूळ रक्कम त्यांना परत केली नव्हती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याच्याकडे त्यांच्या पैशांसह सोन्याची मागणी सुरु केली होती, मात्र त्याने विश्वमणी तिवारी यांच्यासह त्यांचे दोन मित्र कमल पारेख आणि पराग मालदे यांना त्यांची मूळ रक्कम परत केली नाही.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी नितेशने त्याची पत्नी मुक्ता, वडिल शांतीलाल आणि नातेवाईक भरतभाई यांच्या मदतीने ही फसवणुक केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या चारही आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुंतवणुकीसाठी घेतलेल्या पाच कोटी दहा लाख रुरपयांच्या अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या चारही आरोपींना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page