सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे दोन्ही शूटर गजाआड
गुजरातच्या भुज शहरात मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ एप्रिल २०२४
मुंबई, – दबंग बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारप्रकरणी दोन्ही शूटरला गजाआड करण्यात अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना यश आले आहे. गोळीबार करुन मुंबईतून पळून गेलेल्या या दोघांनाही गुजरात भुज शहरातून अटक करण्यात आली असून त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाणार आहे. या दोघांना मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. आरोपींकडून गुन्ह्यांतील विदेशी पिस्तूलसह जिवंत काडतुसे, मोबाईल आणि काही कॅश जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीत या दोघांनीच सलमान खान याच्या घरासमोर हवेत गोळीबार केल्याची कबुली दिली आहे.
रविवारी सकाळी पाच वाजता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर दोन अज्ञात बाईकस्वारांनी गोळीबार केला होता. हवेत चार ते पाच गोळ्या फायर करुन शूटरने परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. गोळीबारानंतर ते दोघेही मेहबूब स्टुडिओजवळ गेले. तिथे त्यांनी एका रिक्षाचालकाला वसईला जाण्याचा रस्ता विचारला होता. काही वेळानंतर त्यांनी माऊंट मेरीजवळ बाईक सोडून रिक्षातून पलायन केले होते. रिक्षातून वांद्रे रेल्वे स्थानकात आल्यांनतर ते दोघेही सांताक्रुज येथे उतरले. सांताक्रुज येथून वाकोला येथून त्यांनी रिक्षातून नवी मुंबई असा प्रवास केला. सीसीटिव्ही फुटेजमध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला असून ते सर्व फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन एका मारेकर्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचे नाव विशाल ऊर्फ कालू असून तो गॅगस्टर रोहित गोदाराचा खास सहकारी म्हणून ओळखला जातो. कालू हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हत्येसह अन्य गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तो हरियाणाच्या गुरुग्रामचा रहिवाशी आहे. काही महिन्यांपूर्वी रोहतकमध्ये एका भंगार व्यापार्याची गोळ्या झाडून हत्या झाली होती. या हत्येत विशालचा सहभाग होता. या गोळीबारानंतर तो पळून गेला होता. विशाल हा विदेशात राहणार्या रोहितच्या संपर्कात होता. त्याच्या आदेशावरुन त्याने आताापर्यंत अनेक गुन्हे केले आहेत. विशालचा दुसर्या सहकार्याची ओळख पटली नसली तरी तो राजस्थानचा रहिवाशी असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे या गोळीबाराच्या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांचा वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसकडून स्वतंत्रपणे तपास सुरु आहे. गुन्ह्यांतील बाईक पोलिसांनी ताब्यात घेतली असून ही बाईक पनवेल येथे राहणार्या एका व्यक्तीच्या मालकाची आहे. त्याने ती बाईक शूटरला विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
याच चौकशीतून दोन्ही शूटर गेल्या एक महिन्यांपासून पनवेल येथे वास्तव्यास होते. तिथे त्यांनी एक घर भाड्याने घेतले होते. त्यामुळे बाईक विक्री करणार्या व्यक्तीसह घर भाड्याने देणार्या घरमालकाची पोलिसांनी चौकशी केली होती. या चौकशीतून या दोघांविरुद्ध जास्तीत जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या दोघांनी कोणाला संशय येऊ नये म्हणून ते नोकरीसह इतर कामासाठी पनवेल येथे आल्याचे सांगितले होते. याच दरम्यान त्यांनी सलमान खानच्या पनवेल येथील फॉर्म हाऊसची रेकी होती. त्यानंतर त्यांनी वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेटची रेकी करुन ती माहिती रोहित गोदाराला दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या दोन्ही रेकीदरम्यान सलमान तिथे कधी येतो, किती वेळ राहतो, कधी जातो, त्याच्यासोबत त्याच्या खाजगी सुरक्षारक्षकासह पोलिसांच्या सुरक्षेची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस बंदोबस्तात सलमानच्या दिशेने गोळीबार करणे शक्य नसल्याने त्यांनी पहाटे त्याच्या घराजवळ गोळीबार करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. दुसरीकडे ज्या आयपी ऍड्रेसवरुन पोस्ट करुन सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेण्यात आला होता, ती पोस्ट अनमोल बिष्णोई यानेच पाठविली होती. त्या पोस्टचा आयपी ऍड्रेस पोतुर्गाल असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
पळून गेलेल्या शूटरच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना दोन्ही आरोपी नवी मुंबईतून गुजरातला पळून गेल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. ते दोघेही भुज शहरात लपल्याची माहिती मिळताच या पथकाने रात्री उशिरा पावणेदोन वाजता दोन्ही शूटरला शिताफीने अटक केली. चौकशीत त्यांनीच सलमानच्या घरासमोर गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. या कबुलीनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील पिस्तूलसह इतर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान मंगळवारी दुपारी पोलीस मुख्यालयात एका पत्रकार परिषदेत या गुन्ह्यांची माहिती स्वत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती देतील असे सांगण्यात आले.