मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 जानेवारी 2026
मुंबई, – विलेपार्ले येथील एनएम कॉलेजमध्ये प्रोफेसर असलेल्या आलोककुमार सिंग यांची अज्ञात व्यक्तीने तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याची घटना मालाड रेल्वे स्थानकात घडली. विलेपार्ले-मालाड रेल्वे स्थानकादरम्यान लोकलने प्रवास करताना क्षुल्लक वादातून हा प्रकार घडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला आहे. शनिवारी सायंकाळी मालाड रेल्वे स्थानकात घडलेल्या या घटनेने रेल्वे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
आलोककुमार हे त्यांच्या कुटुंबियांसोबत कांदिवली परिसरात राहत असून सध्या विलेपार्ले येथील एन. एम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होते. सायंकाळी ते कॉलेजमधून घरी जाण्यासाठी निघाले होते. विलेपार्ले रेल्वे स्थानकात आल्यानंतर त्यांनी बोरिवली लोकल पकडली होती. ही लोकल सायंकाळी पावणेसहा वाजता मालाड रेल्वे स्थानकात येताच त्यांचे त्यांच्यासोबत लोकलमध्ये प्रवास करणार्या एका व्यक्तीशी वाद झाला होता.
या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि काही कळण्यापूर्वीच या आरोपीने आलोककुमार यांच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात ते रक्तबंबाळ झाले होते. हल्ल्यानंतर आरोपी मालाड रेल्वे स्थानकातून पळून गेला होता. ही माहिती प्राप्त होताच बोरिवली रेल्वे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या आलोककुमार यांना तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. काही प्रवाशांच्या जबानीवरुन आलोककुमार आणि आरोपी प्रवाशामध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाले होते. या वादातून त्याने त्यांची तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मालाड रेल्वे स्थानकासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून याच फुटेजवरुन आरोपीची ओळख पटवून त्याचा शोध घेतला जात आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताजी खुपेरकर यांनी दुजोरा दिला आहे.