निवासी सोसायटीमध्ये झालेल्या फायरिंगप्रकरणी कमाल खानला अटक
पिस्तूलची सफाई करताना फायरिंग झाल्याचे तपासात उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 जानेवारी 2026
मुंबई, – अंधेरीतील ओशिवरा परिसरात असलेल्या एका निवासी सोसायटीमध्ये झालेल्या फायरिंगप्रकरणी अभिनेता-निर्माता कमाल रशीद खान याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने मंगळवार 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. परवाना असलेल्या पिस्तूलची सफाई करताना फायरिंग झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ओशिवरा येथील नालंदा सोसायटीमध्ये कमाल खान हा राहतो. रविवारी तो त्याच्या घरी त्याच्या परवाना असलेली पिस्तूलची सफाई करत होता. यावेळी त्याच्या पिस्तूलमधून दोन गोळ्या फायर झाल्या होत्या. अचानक झालेल्या गोळीबाराने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण झाले होते. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र गोळीबाराची माहिती प्राप्त होताच ओशिवरा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
घटनास्थळी पोलिसांना दोन पुंगळ्या सापडल्या होत्या. या पुंगळ्या दुसर्या आणि चौथ्या मजल्यावर जमिनीवर पडल्या होत्या. तेथीलच एका भिंतीवर आणि टेबलावर गोळ्यांचे निशान सापडले आहे. गोळीबारामुळे कालिना येथील फॉरेन्सिक अधिकार्यांना पाचारण करण्यात आले होते. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता.
तपासात जप्त केलेल्या पुंगळ्या कमाल खान याच्या परवाना असलेल्या पिस्तूलची असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याला शुक्रवारी चोकशीसाठी ओशिवरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. यावेळी त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली होती. या चौकशीत त्याने पिस्तूलची सफाई करताना दोन गोळ्या फायर झाल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर कमालला शनिवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पिस्तूल पोलिसांनी आधीच ताब्यात घेतली आहे. ती पिस्तूल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आली आहे. कमाल खान हा अभिनेता आणि निर्माता आहे. त्याच्या वादग्रस्त विधानामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. आता तो निवासी सोसायटीमध्ये झालेल्या फायरिंग घटनेमुळे चर्चेत आला आहे.