शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने 68 लाखांची फसवणुक
दोन मुख्य आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 जानेवारी 2026
मुंबई, – गुंतवणुकीवर अल्पावधीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका सीएसह त्याचे नातेवाईक आणि इतर गुंतवणुकदारांची सुमारे 68 लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही मुख्य आरोपीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. योगेश खिमजी भानुशाली आणि धवल विमलकांत कक्कड अशी या दोघांची नावे असून या दोघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जयेश हरिश सांधा हे अंधेरीतील जे. बी नगर परिसरात राहत असून त्यांची जयेश सांधा अॅण्ड असोशिएट नावाची एक सीए कंपनी आहे. याच परिसरात योगेश हा राहत असून तिथे त्याचा चप्पल विक्रीचे एक दुकान आहे. एकाच परिसरात राहत असल्याने ते एकमेकांच्या परिचित होते. जानेवारी 2024 रोजी त्यांची भेट झाली होती. या भेटीदरम्यान त्याने त्यांना त्याला शेअरमार्केट, आयपीओचा चांगला अभ्यास आहे. त्याने अनेकांना गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन केले आहे. शेअरमार्केटच्या आयपीओमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला होईल असे सांगितले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्याच्या मोबाईलमध्ये इतर व्यक्तींनी केलेल्या गुंतवणुकीची माहिती देताना त्यांना अल्पावधीत चांगला फायदा झाल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता.
त्याच्या आमिषाला बळी पडून त्यांनी त्याच्यामार्फत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. याबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर त्याने गुंतवणुक रक्कम धवल कक्कड याच्या कंपनीत गुंतवणुक करुन त्यांना चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याकडे ठराविक रक्कमेची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा झाला होता. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने त्यांना त्यांच्यावर विश्वास बसला होता. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या इतर नातेवाईक तसेच अन्य लोकांनी त्यांच्याकडे सुमारे 68 लाख रुपयांची गुंतवणुक केली होती.
या गुंतवणुकीवर त्यांना अंशत परतावा देऊन त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला, मात्र नंतर गुंतवणुक रक्कमेवर परतावा न देता त्यांची फसवणुक केली होती. याबाबत विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. काही दिवसांनी त्यांनी त्यांचे कॉल घेणे बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच जयेश सांधा यांनी आरे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर योगेश भानुशाली आणि धवल कक्कड या दोघांविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि महाराष्ट्र ठेवीदाराच्य अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. प्राथमिक तपासात ही फसवणुक 68 लाखांची असली तर त्यांच्याकडे इतर काही लोकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केली आहे. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.