मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 जानेवारी 2026
मुंबई, – जानेवारी महिन्यांत माटुंगा आणि दादर येथे झालेल्या दोन घरफोडीचा पर्दाफाश करण्यात माटुंगा आणि भोईवाडा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी चार आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. सरुद्दीन ताजुद्दीन शेख, बरकत शफीउल्ला शेख, इस्माईल अस्लम शहा आणि अरबाज इस्माईल शहा अशी या चौघांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर चारही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील सरुद्दीनविरुद्ध अठराहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे तर इतर तिघांच्या अटकेने व्ही. पी रोड आणि माटुंगा पोलीस ठाण्यातील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दिलीप मंछालाल परिहार हे कापड व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत दादर परिसरात राहतात. याच परिसरात त्यांचे कपड्याचे एक शॉप आहे. 12 जानेवारी ते 13 जानेवारी 2026 या कालावधीत त्यांच्या दुकानातील शटर तोडून अज्ञात व्यक्तीने आत प्रवेश केला होता. या व्यक्तीने दुकानातील सुमारे 97 हजाराची कॅश चोरी करुन पलायन केले होते. दुसर्या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच दिलीप परिहार यांनी भोईवाडा पोलिसांत तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त धनश्याम पंतगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ठाकूर, पोलीस निरीक्षक नितीन महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल चौधरी, अनिल भोंग, पोलीस हवालदार नथुराम चव्हाण, अविनाश सुतार, पोलीस शिपाई प्रदीप राठोड, हेमंत सुळे यांनी तपास सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने या गुन्ह्यांत इस्माईल, अरबाज आणि बरकत यांचा सहभाग उघडकीस आला होता. ते तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून काशिमिरा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर या पथकाने तिन्ही आरोपींना चौकशीसाठी ताबत घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. चौकशीत त्यांनी व्ही. पी रोड आणि माटुंगा पोलीस ठाण्यात दोन घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. तिन्ही आरोपी मजुरीचे काम करत असून बरकत आणि अरबाज हे गॅरेजमध्ये कामाला आहेत.
दुसर्या घटनेत सरुद्दीन शेख या आरोपीस माटुंगा पोलिसांनी अटक केली. 6 जानेवारीला त्याने माटुंगा येथील एका फ्लॅटमध्ये प्रवेश करुन सोन्याची चैन आणि कॅश चोरी करुन पलायन केले होते. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे, पोलीस निरीक्षक प्रतिभा जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलीस हवालदार तांबे, पोलीस शिपाई बंजारा, नेहारे, नवले, बारशी यांनी तपास सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी सरुद्दीनला मुंब्रा येथून या पथकाने अटक केली.
त्याच्याकडून चोरीची सोन्याची चैन पोलिसांनी हस्तगत केली आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध घरफोडीच्या अठरा गुन्ह्यांची नोंद आहे. चौकशीत त्याने भोईवाडा आणि आरएके मार्ग पोलीस ठाण्यातील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. अटकेनंतर या चारही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांचा संबंधित पोलिसांकडून ताबा घेतला जाणार आहे.