मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ एप्रिल २०२४
मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) – मुंबई शहरात झालेल्या तीन विविध अपघाताच्या घटनेत एका डॉक्टरसह तिघांचा मृत्यू झाला. भरत तुकाराम नवतुरे, नूरमोहम्मद अलीमोहम्मद खान आणि सुरेश विश्वनाथ कट्टेकोला अशी या मृतांची नावे आहेत. याप्रकरणी काळाचौकी, टिळकनगर आणि शीव पोलिसांनी तीन अपघाताची नोंद करुन दोन चालकांचा अटक केली तर एका चालकाचा मृतांमध्ये समावेश आहे. अटकेनंतर दोन्ही चालकांची जामिनावर सुटका करण्यात आली. तिन्ही अपघात शीव, चेंबूर आणि शिवडी परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहिला अपघात सोमवारी सकाळी अकरा वाजता चेंबूर येथील मानखुर्द-घाटकोपर नवीन लिंक रोड ब्रिजवर झाला. सुरेश कट्टेकोला हे व्यवसायाने डॉक्टर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गोवंडी येथे राहतात. सोमवारी सकाळी ते मानखुर्द-घाटकोपर नवीन लिंक रोड ब्रिजवरुन जात होते. यावेळी भरवेगात जाणार्या एका डंपरच्या धडकेने ते डंपरच्या चाकाखाली आले होते. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी त्यांचा भाऊ रविंद्र विश्वनाथ कट्टेकोला यांच्या तक्रारीवरुन टिळकनगर पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच मोहम्मद शाबीर इस्माईल शेख याला पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.
दुसरा अपघात सोमवारी सकाळी साडेआठ वाजता शिवडीतील टी. जे रोड, सेलेस्टिया इमारतीजवळील बीएमसी पार्किंगजवळ झाला. भरत हा ठाण्यातील शहापूर येथे राहत असून काळाचौकी येथील मोहम्मद हातिम दूधवाला यांच्या मोहम्मद टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्समध्ये गेल्या बारा वर्षांपासून चालक म्हणून कामाला आहे. शनिवारी भरत हा नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला होता. रविवारी त्याने त्याची बस सेलेस्टिया इमारतीजवळील बीएमसी पार्किंगजवळ लावली होती. त्यानंतर तो बसखाली झोपून गेला होता. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता त्याचा सहकारी गोकुळदास हा बस घेण्यासाठी तिथे आला होता. यावेळी बस चालू केल्यानंतर त्याला बसच्या मागच्या टायरखाली कोणीतरी चिरडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने बस मागे घेऊन पाहिले असता भरत हा बसखाली येऊन गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याने त्याला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान दुपारी भरतचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अपघाताची नोंद करुन पोलिसांनी बसचालक गोकुळदास संजय नवतुरे याला अटक केली. अटकेनंतर त्याला जामिनावर सोडून देण्यात आले.
अन्य एका अपघातात नूरमोहम्मद खान या ४० वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. नूरमोहम्मद हा गोवंडी येथे राहत होता. त्याचा बाबू मलिक नावाचा एक मित्र असून त्याच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याला पाहण्यासाठी शनिवारी रात्री आठ वाजता नूरमोहम्मद हा त्याचे तीन मित्र मोहम्मद झापाद नौशाद खान, मोहम्मद फरीद खान आणि मेराज अहमद मोहम्मद अनिस शेख असे तिघेही दोन बाईकवरुन गोवंडीहून शीव रुग्णालयात जाण्यासाठी निघाले होते. शीव रुग्णालयाजवळील ब्रिजवर येताच नूरमोहम्मदने भरवेगात बाईक चालविण्याच्या प्रयत्नात समोरुन येणार्या एका टेम्पोला धडक दिली होती. त्यात त्याच्यासह मेराज शेख असे दोघेही जखमी झाले होते. या दोघांनाही शीव रुग्णालयात दाखल केले असता तिथे नूरमोहम्मदला मृत घोषित करण्यात आले तर मेराजला उपचारानंतर सोडून देण्यात आले. याप्रकरणी मृत नूरमोहम्मदविरुद्ध स्वतच्याच मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आजारी मित्राला पाहण्यासाठी गेलेल्या नूरमोहम्मदचा अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच गोवंडी परिसरात प्रचंड शोककळा पसरली होती. भरवेगात बाईक चालविणे त्याच्या जिवावर बेतल्याचे पोलिसांनी सांगितले.