मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ एप्रिल २०२४
मुंबई, – बोगस दस्तावेज सादर करुन सहाजणांच्या एका टोळीने एका खाजगी बँकेतून २६ लाख ६८ लाख रुपयांचे पर्सनल लोन घेतल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेच्या वतीने आलेल्या तक्रार अर्जानंतर संबंधित सहाही आरोपीविरुद्ध बीकेसी पोलिसांनी भादवीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यात अमीतकुमार शर्मा, अभिषेक अग्रवाल, रमेशकुमार, वरुण शर्मा ऊर्फ रिषी शर्मा, विवेक सिंग ऊर्फ कर्ण सिंग आणि दर्शन सिंग ऊर्फ अजय सिंग यांचा समावेश आहे. या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही बँकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
प्रमोदकुमार आमेटा हे कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात राहतात. ते सध्या एका खाजगी बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. त्यांच्यावर बँकेत होणार्या फसवणुकीच्या तक्रारीची शहानिशा करणे, या तक्रारीनंतर संबंधित पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी आहे. त्यांच्या बँकेची एक अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर बँकेचे खातेदार ऑनलाईन कर्जासाठी अर्ज करतात. त्यात पर्सनल लोन घेणार्या खातेदारांची संख्या अधिक आहे. या वेबसाईटवर अर्ज केल्यानंतर संबंधित खातेदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची शहानिशा केली जाते. त्यानंतर त्यांना बँकेतून कर्ज दिले जाते. २० मार्चला त्यांच्याकडे सहा खातेदारांनी बँकेतून पर्सनल लोन घेऊन बँकेची फसवणुक केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांना बँकेने अमीतकुमार शर्मा, अभिषेक अग्रवाल यांना प्रत्येकी ४ लाख ५९ हजार, रमेशकुमारला २ लाख ५० हजार, दर्शनकुमार, वरुणकुमार व विवेक सिंग यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे पर्सनल लोन दिल्याचे समजले होते. त्यापैकी वरुण शर्मा, दर्शन सिंग आणि विवेक सिंग यांनी बँकेत बोगस दस्तावेज सादर केल्याचे नंतर उघडकीस आले होते. त्याने लोनसाठी दिलेले पॅनकार्ड बरोबर होते, मात्र त्यावरील पत्ता आणि फोटो वेगळा होता. ते पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक नव्हते. अशा प्रकारे त्यांनी बोगस दस्तावेज सादर करुन २६ लाख ६८ हजार रुपयांचे पर्सनल लोन घेऊन बँकेची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच प्रमोदकुमार यांनी संबंधित सहाजणांविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अमीत शर्मा, अभिषेक अग्रवाल, रमेशकुमार, वरुण शर्मा, विवेक सिंग आणि दर्शन सिंग यांच्याविरुद्ध ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ भादवी सहकलम ६६ सी, ६६ डी आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.