संपूर्ण कट बिहारमध्ये रचल्याचे तपासात उघड

हरियाणा येथून एका संशयिताला ताब्यात घेतले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ एप्रिल २०२४
मुंबई, – दहशत निर्माण करण्यासाठी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ गोळीबार करण्याचा कट काही महिन्यांपूर्वीच बिहारमध्ये रचण्यात आला होता अशी धक्कादायक माहिती दोन्ही आरोपींच्या चौकशीतून उघडकीस आली आहे. त्यासाठी दोघांनाही योग्य वेळेस पैसे आणि घातक शस्त्रे पुरविण्यात आले होते. पैसे आणि शस्त्रे पुरविणार्‍या व्यक्तींची नावे समोर आल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी आता गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान याच कटात सोनू गुप्ता नावाच्या एका संशशिताला हरियाणा येथून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्याला मुंबईत आणले जाणार आहे. सोनू हा या कटातील विकीकुमार गुप्ता याचा भाऊ असल्याचे बोलले जाते. गोळीबारानंतर सोनू हाच या दोन्ही आरोपींच्या संपर्कात होता अशी माहिती तपासात उघडकीस आली आहे. दरम्यान पोलीस कोठडीत असलेल्या विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर पाल या दोघांकडून पोलिसांनी अनेक धक्कादायक खुलासे करण्यात यश आले असून त्यांच्या चौकशीतून गुन्हे शाखेचे पथक गुजरात, दिल्ली, बिहार आणि हरियाणा येथे पाठविण्यात आले होते.

रविवारी सकाळी पाच वाजता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बाईकवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना गुजरातच्या भूज येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती. विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर पाल या दोघांना अटक केल्यानंतर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन्ही आरोपींनी गोळीबाराचा कट बिहारमध्ये शिजल्याचे सांगितले. त्यासाठी दोघांनाही चार लाखांची सुपारी देण्यात आली होती. त्यापैकी एक लाख रुपये त्यांना देण्यात आले होते. उर्वरित तीन लाख रुपये गोळीबारानंतर मिळणार होते. मात्र त्यापूर्वीच ते दोघेही पकडले गेले आहे. या पैशांतून त्यांनी काय केले याचा तपशील काढण्याचे काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना ऑनलाईन ५० हजार रुपये पाठविण्यात आले होते. ही रक्कम त्यांना कोणीही पाठविली होती. गोळीबारानंतर या दोघांनाही भूज येथे जाण्याचे आदेश मिळाले होते, त्यामुळे ते दोघेही मुंबईतून गुजरातला पळून गेले होते. भूजला जाण्यामागे त्यांचा काय उद्देश होता याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपासकामी गुन्हे शाखेचे पथक भूज, राजस्थान, बिहार आणि दिल्लीला जाणार आहे. मुंबई आणि पनवेल येथे राहताना ते दोघेही कोणाला भेटले होते याचाही पोलिसांकडून तपास सुरु आहे. बिहारहून मुंबईत आणि पनवेलला गेल्यानंतर अनमोल बिष्णोई हा या दोघांच्या नियमित संपर्कात होता. त्याच्याकडून या दोघांनाही पुढील सूचना मिळत होत्या असेही या दोघांनी तपासात कबुली दिली आहे.

सलमान खान याच्या घराजवळ झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी बिष्णोई टोळीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे या कटात सामिल असलेल्या प्रत्येकाची पोलिसांकडून चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणार आहे. याच गुन्ह्यांत लॉरेन्स बिष्णोईची मुंबई पोलिसांकडून कोठडी घेण्याची शक्यता आहे. दोन्ही आरोपींची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी तपासली जात असून गरज पडल्यास त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान मंगळवारी हरियाणा येथून पोलिसांनी सोनू गुप्ता याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सोनू हा विकीकुमारचा भाऊ आहे. गोळीबारानंतर ते दोघेही मुंबईतून गुजरातला पळून गेले होते. यावेळी त्यांनी त्यांचे सिमकार्ड फेंकून दिले होते. नवीन सिमकार्डवरुन ते दोघेही सोनूच्या संपर्कात होते. सोनूला अन्य एका व्यक्तीकडून पुढील आदेशाची माहिती दिली जात होती आणि तो ती माहिती दोन्ही आरोपींना देण्याचे काम करत होता असे बोलले जाते. सोनूला लवकरच पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page