मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ एप्रिल २०२४
मुंबई, – पोलीस आणि आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करुन अटकेची भीती दाखवून एका व्यावसायिकाची अज्ञात सायबर ठगाने सुमारे ३५ लाखांची ऑनलाईन फसवणुक केली. याप्रकरणी फसवणुकीची तक्रार प्राप्त होताच पश्चिम प्रादेशिक सायबर सेल विभागाने काही तासांत व्यावसायिकाने गमावलेली ३५ लाखांची रक्कम वाचविण्यात यश मिळविले आहे. या कामगिरीबाबत त्यांनी सायबर सेल पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.
यातील तक्रारदार व्यावसायिक असून ते दक्षिण मुंबईत त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. गेल्या आठवड्यात त्यांना काही अज्ञात व्यक्तींनी फोन करुन ते पोलीस आणि आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्यांच्या नावाने फेड्रक्स कुरिअर प्राप्त झाले असून त्याच्या बँक खात्यात काही संशयास्पद आर्थिक व्यवहार झाले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार असून याच गुन्ह्यांत त्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होईल अशी भीती दाखविणयत आली होती. ही कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून संबंधित तोतया पोलीस आणि आयकर अधिकार्यांनी पैशांची मागणी केली होती. कारवाईसह बदनामीच्या भीतीने त्यांनी एका बँक खात्यात टप्याटप्याने ३५ लाख १२ हजार ८२० रुपये ट्रान्स्फर केले होते. हा प्रकार परिचित त्यांनी त्यांच्या व्यक्तीला सांगितल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून त्यांची फसवणुक झाल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांनी तातडीने सायबर सेलच्या ऑनलाईन १९३० हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. या तक्रारीची संबंधित अधिकार्यांनी गंभीर दखल घेत पश्चिम प्रादेशिक सायबर सेलकडे तपास सोपविला होता. फसवणुकीची तक्रार प्राप्त होताच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक आबूराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, पोलीस शिपाई किरण पाटील यांनी तपासाला सुरुवात केली होती. या पथकाने संबंधित बँकेच्या नोडल अधिकार्यांशी संपर्क साधून ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्यातील व्यवहार थांबविण्याची विनंती केली होती. त्यानंतर या अधिकार्यांनी या खात्यातील व्यवहार थांबवून ३५ लाख १२ हजार ८५० रुपयांची रक्कम फ्रिज केली होती. ही रक्कम लवकरच तक्रारदार व्यावसायिकाच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
अशा फसवणुकीबाबत काय काळजी घ्याल
नामांकित कुरिअर कंपन्याचे प्रतिनिधी, पोलीस, आयकर, ईडी, सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करुन आपले बँक खात्यातून अनियमित व्यवहार झाल्याचे किंवा आपले नाव ड्रग्स, हत्यारे, हवाला ट्रान्झेक्शनमध्ये झाल्याचे सांगून येणारे कॉल हाताळतांना सावधानता बाळगावी.
समोरील व्यक्तीने गुन्हा दाखल करुन अटकेची भीती दाखविल्यास घाबरुन न जाता जवळच्या पोलीस ठाण्यांशी संपर्क साधावा.
गोंधळून न जाता कोणताही आर्थिक व्यवहार करु नये किंवा कुठल्याही बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करु नये.
आर्थिक फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तात्काळ सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा.