ओएनजीसीमध्ये नोकरीच्या आमिषाने सतरा लाखांची फसवणुक

दहा महिन्यांपासून वॉण्टेड  असलेल्या तोतया अधिकार्‍याला अटक

0

अरुण सावरटकर
1 मार्च 2026
मुंबई, – ओएनजीसीमध्ये उच्च पदावर काम करत असल्याची बतावणी करुन एका वयोवृद्धाच्या मुलाला ओएनजीसीमध्ये चांगल्या पदावर नोकरीचे आश्वासन देऊन सुमारे सतरा लाखांची फसवणुक केल्याच्या कटातील एका मुख्य वॉण्टेड आरोपीस माहीम पोलिसांनी अटक केली. नरेंद्र मानगुरुजी माऊंडेकर असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच नरेंद्र हा पळून गेला होता, अखेर दहा महिन्यानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या चौकशीतून नोकरीच्या आमिषाने फसवणुक झाल्याचे इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. याच गुन्ह्यांत त्याला संदीप दादू जाधव आणि यशोदा नरेंद्र माऊंडेकर यांनी मदत केल्याचा आरोप असून त्यांना सहआरोपी करण्यात आले होते असे पोलिसांनी सांगितले.

64 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार जयप्रकाश शिवाजी तामोरे हे माहीमच्या कोळीवाडा, जीएमएनए गंगाबाई धनू चाळीत राहतात. ते भारतीय रेल्वेत नोकरी होते, सध्या ते निवृत्त झाले आहेत. त्यांचा जावई सचिन सरोडकर हा कोल्हापूर येथे राहत असून त्याच्यामार्फत त्यांची संदीप जाधवशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. मे 2016 रोजी त्याने त्यांना तो ओएनजीसीमध्ये कामाला आहे. तिथेच नरेंद्र आणि यशोदा माऊंडेकर हे वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक बेरोजगार तरुणांना ओएनजीसीमध्ये नोकरी दिली आहे. ते त्यांच्या मुलालाही तिथे नोकरी देतील असे सांगितले. त्यामुळे ते नरेंद्र व यशोदा यांना भेटण्यासाठी त्यांच्या गुजरात येथील अहमदाबादच्या घरी गेले होते. तिथे त्यांची या दोघांशी भेट झाली होती.

या भेटीत त्यांच्यात मुलाला नोकरीबाबत सविस्तर चर्चा झाली होती. यावेळी त्यांनी नोकरीसाठी त्यांच्याकडे वीस लाखांची मागणी केली होती. ही रक्कम दिल्यानंतर त्यांच्या मुलाला चांगल्या पदावर कायमस्वरुपी नोकरीचे आश्वासन दिले होते. मात्र वीस लाख जास्त असल्याने त्यांनी त्यांना सतरा लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. 2 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोंबर 2026 या कालावधीत त्यांनी त्यांना टप्याटप्याने सतरा लाखांचे पेमेंट केले होते. याच दरम्यान त्यांनी त्यांच्या मुलाला मेडीकलसाठी बोलाविले होते. मेडीकलनंतर त्याला लवकरच नोकरीवरुन रुजू केले जाईल असे सांगितले. काम झाले नाहीतर त्यांना त्यांचे पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी जयप्रकाश तामोरे यांना एक धनादेश दिला होता. मात्र दिलेल्या वेळेत त्यांनी त्यांच्या मुलाला नोकरी दिली नाही.

याबाबत विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्यांना वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. 2016 ते 2020 पर्यंत त्यांनी सतत नोकरीचा पाठपुरावा केला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी नरेंद्र व यशोदा यांनी दिलेला धनादेश बँकेत टाकला होता, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. नऊ वर्ष उलटूनही त्यांनी त्यांच्या मुलाला नोकरी दिली नाही किंवा नोकरीसाठी घेतलेले सतरा लाख रुपये परत केले नाही. त्यामुळे त्यांनी संदीप जाधव, नरेंद्र माऊंडेकर आणि यशोदा माऊंडेकर यांच्याविरुद्ध माहीम पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मे 2025 रोजी या तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी नोकरीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दहा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या नरेंद्र माऊंडेकर याला पोलिसांनी गुजरात येथून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने नोकरीच्या आमिषाने जयप्रकाश तामोरे यांची फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. नरेंद्र आणि यशोदा यांनी अशाच प्रकारे अनेकांना नोकरीच्या नावाने गंडा घातला आहे. त्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून इतर काही फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page