लाचेच्या गुन्ह्यांत पोलीस उपनिरीक्षकासह सहाय्यक निबंधकाला अटक

दुसर्‍या कारवाईत पोलीस हवालदाराचे लाचेच्या रक्कमेसह पलायन

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – लाचेच्या दोन गुन्ह्यांत एका पोलीस उपनिरीक्षकासह सहाय्यक निबंधकाला मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. हरेश्‍वर यशवंत शेंडे आणि प्रदीप कारभारी सानप अशी या दोघांची नावे आहेत. यातील हरेश्‍वर हा व्ही. पी रोड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक तर प्रदीप सानप हा ई विभागातील सहकारी संस्थेत सहाय्यक निबंधक म्हणून कार्यरत आहेत. अटकेनंतर या दोघांनाही विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. दुसर्‍या कारवाईत व्ही. पी रोड पोलीस ठाण्याचा पोलीस हवालदार धनंजय दिलीप वायसे हा लाचेची पन्नास हजाराची कॅश घेऊन पळून गेला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. गुरुवारी व्ही. पी रोड पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेने तिथे उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली होती.

पहिल्या गुन्ह्यांतील ३९ वर्षांचे तक्रारदार गिरगाव परिसरात राहत असून त्यांच्यासह त्यंच्या आईविरुद्ध व्ही. पी रोड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांचा तपास हरेश्‍वर शेंडे यांच्याकडे होता.गुन्हा दाखल होताच त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली होती. चौकशीदरम्यान हरेश्‍वरने त्यांना मदत करण्याचे आश्‍वासन देत त्यांच्याकडे ५० हजाराची लाचेची मागणी केली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने १६ नोव्हेंबरला त्यांनी हरेश्‍वर शेंडे यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची त्याच दिवशी तसेच १८ नोव्हेंबरला शहानिशा करण्यात आली होती. यावेळी पोलीस उपनिरीक्षक हरेश्‍वर शेंडे यांनी तक्रारदारांना गुन्ह्यांत मदत करण्यासाठी पन्नास हजाराची मागणी करुन ती रक्कम स्विकारण्याचे मान्य केले होते.

बुधवारी या पथकाने व्ही. पी रोड पोलीस ठाण्यात सापळा लावला होता. ठरल्याप्रमाणे तक्रारदार हरेश्‍वर शेंडे यांना लाचेची रक्कम देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी ती रक्कम पोलीस हवालदार धनंजय वायसे यांच्याकडे देण्यास सांगितली. त्यामुळे त्यांनी ती रक्कम त्यांना दिली होती, मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावल्याचा संशय आल्याने धनंजय वायसे लाचेची रक्कम घेऊन तेथून पळून गेले होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र तो पळून जाण्यास यशस्वी झाला. त्यानंतर या पथकाने पोलीस उपनिरीक्षक हरेश्‍वर शेंडे यांना लाचेच्या गुन्ह्यांत अटक केली. या गुन्ह्यांत पोलीस हवालदार धनंजय वायसे यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल हारुगडे, पोलीस निरीक्षक जगदीश मोरे, पोलीस हवालदार सोनोने, झाजुरणे, पोलीस शिपाई रेडेकर, महिला पोलीस शिपाई नारुळकर, नलावडे यांनी केली.

दुसर्‍या कारवाईत या अधिकार्‍यांनी सहकारी संस्था ई विभागाचे सहाय्यक निंबंधक प्रदीप सानप यांना तीस हजाराची लाच घेताना अटक केली. यातील तक्रारदार ६२ वर्षांचे असून व्यवसायाने वकिल आहेत. त्यांच्या अशिलाने माझगाव सहकारी सोसायटीमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुनही त्यांन सोसायटीकडून सभासदत्व देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी ई विभाग, सहकार संस्थेत सोसायटीच्या पदाधिकार्‍यांविरुद्ध तक्रार केली होती. या खटल्याची त्यांच्या अशिलामार्फत ते बाजू मांडत होते. त्यांनी त्यांना वकिलपत्र दिले होते. या खटल्यासंदर्भात त्यांनी तेथील सहाय्यक निबंधक प्रदीप सानप यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी त्यांच्या बाजूने निकान देण्यासाठी तसेच निकालाची प्रत देण्यासाठी त्यांच्याकडे ५० हजाराची लाचेची मागणी केली होती.

ही लाच देण्याची तयारी दर्शवून त्यांनी प्रदीप सानप यांच्याविरुद्ध २८ ऑक्टोंबरला मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची ४ नोव्हेंबरला शहानिशा करण्यात आली होती. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे पन्नासऐवजी तीस हजाराची मागणी करुन ती रक्कम स्विकारण्याचे मान्य केले होते. ठरल्याप्रमाणे बुधवारी सायंकाळी चार वाजता या पथकाने प्रदीप सानप यांना तक्रारदाराकडून तीस हजाराची लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाप्रसाद मुदिराज, पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे, सहाय्यक फौजदार तेली, पोलीस हवालदार भोसले, च्हाण, मठपती, महिला पोलीस शिपाई खेडकर, वाईनगडे, पोलीस हवालदार चालक देसाई, पोलीस शिपाई चालक साबळे यांनी केली.

या दोन्ही कारवाईत पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले असून कारवाईनंतर त्यांच्या घराची झडती घेण्यात आली होती. त्याचा तपशील समजू शकला नाही. अटकेनंतर दोन्ही आरोपींना विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस हवालदार धनंजय वायसे हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page