अंधेरी रेल्वे स्थानकात चाकू हल्ल्यात प्रवाशी जखमी
सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीस काही तासांत अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – लोकलमधील प्रवाशांमध्ये होणार्य वादाची मालिका सुरु असून रविवारी दुपारी अंधेरी रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांच्या भांडणात तिसरा प्रवाशी चाकू हल्ल्यात जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरेश द्वारका शर्मा असे या प्रवाशाचे नाव असून त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी अंधेरी रेल्वे स्थानकात भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी प्रवाशाला पोलिसांनी अटक केली. शिवाजी लक्ष्मण गायकवाड असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा नाशिकचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
सुरेश द्वारका शर्मा हे मूळचे झारखंडच्या हजारीबागचे रहिवाशी असून सध्या ते धारावीतील राजीव गांधी नगर परिसरात राहतात. ते सुतार म्हणून काम करत असून त्यांच्यासोबत त्यांचा गावचा एक मित्र राहतो. रविवारी ते बोरिवली येथे शेठ संदीप खरचे यांना भेटण्यासाठी गेले होते. काम संपल्यानंतर त्यांनी बोरिवलीहून चर्चगेट लोकल पकडली. यावेळी त्यांना दोन प्रवाशी क्षुल्लक कारणावरुन वाद घालत असल्याचे दिसून आले. याच दरम्यान ही लोकल अंधेरी रेल्वे स्थानकात आली. यावेळी भांडण करणारा एक प्रवाशी उतरला आणि दुसरा दरवाज्याजवळ उभा राहिला होता. याच दरम्यान रेल्वे स्थानकात उतरलेल्या प्रवाशाने त्याच्याकडील चाकू लोकलमध्ये उभ्या असलेल्या प्रवाशाच्या दिशेने फेंकून मारला. त्यात सुरेश शर्मा यांच्या छातीला चाकू लागल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले.
ही लोकल वांद्रे रेल्वे स्थानकात येताच सहप्रवाशांनी तिथे उपस्थित पोलिसांना ही माहिती दिली. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी जखमी झालेल्या सुरेश शर्मा यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची वांद्रे रेल्वे पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर अंधेरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. गुन्हा दाखल होताच आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी शिवाजी गायकवाड या संशयिताला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. शिवाजी हा मूळचा नाशिकचा रहिवाशी आहे. गुन्ह्यांच्या वेळेस तो विनातिकिट रेल्वेतून प्रवास करत असल्याचे उघडकीस आले आहे.
दरम्यान मुंबईकरांची लाईफ लाईन असलेल्या लोकलमध्ये प्रवास करताना प्रवाशांमध्ये होणारे वाद थांबण्याचे नाव घेत नाही. कधी दरवाजाात उभे राहण्यावरुन तर कधी चौथ्या सीटवर बसण्यावरुन, लोकलमध्ये चढताना किंवा उतरताना धक्का लागला म्हणून हाणामारीचे प्रकार होत असतात. काही महिन्यांपूर्वी क्षुल्लक वादातून एका प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या केली होती. त्यात आता रविवारच्या घटनेची भर पडली आहे.