अपहरण झालेल्या तीन वर्षांचा मृतदेह सापडल्याने खळबळ
मृत्यूमागे घातपात नव्हे अपघात असल्याचे तपासात उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ नोव्हेंबर २०२६
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – तीन दिवसांपूर्वी मिसिंग झालेल्या आयान इस्लाम खान या तीन वर्षांच्या मुलाचा मंगळवारी नाल्यात मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. आयानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. आयान हा घराजवळील नाल्यात खेळण्यासाठी गेला, नाल्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या मृत्यूमागे घातपात नसून अपघात असल्याच्या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांनी सांगितले. शवविच्देन रिपोर्टमध्ये त्याचा पाण्यात बुडून झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
इस्लाम मोबीन खान हे अंधेरीतील वायरलेस रोड, जुहू गल्ली, सलामी हॉटेलजवळ त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. आयान हा त्यांचा तीन वर्षांचा मुलगा आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता तो घराजवळ खेळत होता. खेळताना तो अचानक मिसिंग झाला. बराच वेळ होऊन आयान घरी आला नाही म्हणून त्याच्या पालकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नव्हता. त्यामुळे इस्लामने डी. एन नगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आयानची मिसिंगची तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी आयानचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर स्वत सचिन गवस हे त्यांच्या पोलीस टिमसोबत आयानचा शोध घेत होते. यावेळी पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजमध्ये पोलिसांना कुठेही आयान बाहेर जाताना दिसून आला नाही. तो तिथे असल्याचा संशय व्यक्त करुन पोलिसांनी परिसरात त्याचा शोध ठेवला होता. याच दरम्यान एका सीसीटिव्ही फुटेजमध्ये पोलिसांना आयान हा नाल्याच्या दिशेने जाताना दिसून आला होता. त्यामुळे या परिसरात त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना आयान हा नाल्यात बेशुद्धावस्थेत पडल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
त्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यात अयान नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. घटनास्थळी असलेल्या नाल्याजवळ आयान हा खेळता खेळता गेला असावा, खेळताना तो नाल्यात पडला आणि पोहता येत नसल्याने त्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यापूर्वीही तिथे अशाच प्रकारची घटना घडल्याचे बोलले जाते. त्यामुळे डी. एन नगर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आला होता. रात्री उशिरा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांनी दुजोरा दिला. या घटनेमागे घातपात नसून अपघात आहे. आयानचा पाण्यातच बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाल्याचे सांगितले. मिसिंग असलेल्या आयानचा तीन दिवसांनी मृतदेह सापडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.