फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड सेल्स एक्झिक्युटिव्हला अटक

ग्राहकांकडून घेतलेल्या सुमारे सात लाखांचा अपहार केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – माहीम येथील एका नामांकित बाईक शोरुममध्ये दुचाकी खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांकडून घेतलेल्या सुमारे सात लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी हरदेवसिंग देवेंद्रसिंग अस्पिनानी या सेल्स एक्झिक्युटिव्हला माहीम पोलिसांनी अटक केली. त्याने आतापर्यंत २६ हून अधिक ग्राहकाकडून घेतलेल्या पैशांचा अपहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोहक सुरेश छतवानी हा व्यावसायिक असून तो त्याच्या कुटुंबियांसोबत खार येथील पाली हिल रोड, युनियन पार्क परिसरात राहतो. त्यांचा सुझुकी दुाकी विक्रीचा व्यवसाय असून माहीम परिसरात त्यांचे दुचाकी वाहनांचा एक शोरुम आहे. या व्यवसायात त्यांच्यासोबत त्यांचे वडिल सुरेश छतवानी हे पार्टनर आहेत. त्यांच्या शोरुममध्ये हरदेवसिंग हा मे २०२५ तर अनुप बक्षी मार्च २०२५ पासून सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कामाला लागले होते. मे २०२६ रोजी शोरुममधील अकाऊंट विभागातून एका ग्राहकाला कॉल करण्यात आला होता. त्याच्याकडे त्याच्या पेमेंटविषयी विचारणा करण्यात आली होती. यावेळी या ग्राहकाने त्याने दुचाकीचे संपूर्ण पेमेंट केल्याचे सांगितले. मात्र ती रक्कम शोरुमच्या अकाऊंटमध्ये जमा झाली नव्हती.

हा प्रकार संशयास्पद वाटताच संबंधित अधिकार्‍यांनी या पेमेंटची शहानिशा सुरु केली होती. यावेळी त्यांना संबंधित पेमेंट कंपनीच्या अकाऊंटमधून नव्हे तर हरदेवसिंगच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले.त्यामुळे त्यांनी हरदेवसिंगने बुकींग घेतलेल्या सर्व दुचाकी वाहनांच्या व्यवहाराची माहिती काढण्याचा प्रयत्नक केला होता. यावेळी त्याने वेगवेगळ्या ग्राहकांकडून पेमेंट घेऊन ते पेमेंट शोरुमच्या अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर न करता सुमारे सात लाखांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केली होती. जवळपास २६ हून अधिक ग्राहकांकडून त्याने कॅश आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ही रक्कम घेतली होती.

हा प्रकार निदर्शनास येताच अकाऊंट विभागाच्या अधिकार्‍यांनी ही माहिती मोहक छतवानी यांनी दिली होती. या माहितीनंतर हरदेवसिंगला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले होते. त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्याने ग्राहकांकडून घेतलेल्या सुमारे सात लाखांचा अपहार केल्याची कबुली दिली. तसेच ही रक्कम टप्याटप्याने शोरुमच्या अकाऊंटमध्ये जमा करण्याचे आश्‍वासन दिले. त्याच्याविरुद्घ पोलिसांत तक्रार करु नका अशी विनंती केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने अपहार केलेली रक्कम शोरुमच्या अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर केली नाही.

मोहक छतवानी यांनी हरदेवसिंग याच्याविरुद्ध माहीम पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी शोरुमच्या सात लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत गेल्या दोन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या हरदेवसिंगला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page