फसवणुकीसाठी एपीके फाईल पुरविणार्या कटातील तीन आरोपींना अटक
मुख्य आरोपींकडून दिडशे एपीके फाईलची विक्री झाल्याचे उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – फसवणुकीसाठी एपीके फाईल पुरविणार्या कटातील अन्य तीन आरोपींना जुहू पोलिसांनी अटक केली. जाफरुन अन्सारी, राजनकुमार सोनी आणि समीर ऊर्फ शक्तीमान अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यापूर्वी याच गुन्ह्यांत विरेंद्र परशुराम सिंग याला पोलिसांनी अटक केली होती. या तिघांच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या चार झाली होती. या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी रोहित विरेंद्र सिंग हा फरार असून त्याने आतापर्यंत दिडशेहून अधिक एपीके फाईल सायबर ठगांना पुरविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
७५ वर्षांचे किर्ती कांतीलाल दोषी हे विलेपार्ले येथील एस. व्ही रोड, सुंदरवान, प्रविण अपार्टमेंटमध्ये राहतात. ४ ऑगस्टला ते त्यांच्या घरी होते, यावेळी त्यांच्या मोबाईलवर हॉस्पिटल अपॉईटमेंट बुकींग नावाची एक एपीके फाईलचा मॅसेज आला होता. ही फाईल ओपन करताना त्यांचा मोबाईल हॅक झाला होता. काही वेळानंतर त्यांच्या मोबाईलवरुन सहा ऑनलाईन व्यवहार झाले होते. त्यात त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन चार तर त्यांची पत्नी कल्पना हिच्या क्रेडिट कार्डवरुन दोन व्यवहार झाल्याचे दिसून आले होते. या सहाही व्यवहारात अज्ञात व्यक्तीने ३ लाख ८७ हजार रुपयांचे ऑनलाईन व्यवहार केले होते. याबाबत बँकेचे मॅसेज प्राप्त होताच त्यांना फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आला होता. त्यानंतर त्यांनी सायबर हेल्पलाईनसह जुहू पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
प्राथमिक तपासात किर्ती दोषी यांना एपीके फाईल पाठवून अज्ञात सायबर ठगांनी ही फसवणुक केली होती. तात्रिक माहितीवरुन पोलिसांनी विरेंद्र सिंग याला ताब्यात घेतले होते. तपासात त्याचा मुलगा रोहित हा एपीके फाईल बनवून त्याची सायबर ठगांना विक्री करत होता. त्याने आतापर्यंत दिडशेहून अधिक एपीके फाईल बनविले होते. प्रत्येक फाईलमागे तो सायबर ठगांकडून पंधरा ते वीस हजार रुपये कमिशन म्हणून घेत होता. त्याने दिलेली एपीके फाईल किर्ती दोषी यांना पाठवून ही फसवणुक करण्यात आली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी विरेंद्र सिंग याला अटक केली.
त्याच्य चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना जाफरुन अन्सारी, राजनकुमार सोनी आणि समीर ऊर्फ शक्तीमान या तिघांना पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. चौकशीत त्यांचा गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर या तिघांनाही कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत रोहित सिंग हा फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून यापूर्वी अटकेत असलेला विरेंद्र हा त्याचा पिता असल्याचे पोलिसांनी सांगितले.