लॉरेन्स बिष्णोाईच्या नावाने शिवीगाळ करुन धमकी देणे महागात पडले
राजकीय नेत्याच्या स्वीय सहाय्यकाला धमकीप्रकरणी अटकेची कारवाई
अरुण सावरटकर
१५ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – अंडरवर्ल्ड डॉन लॉरेन्स बिष्णोईचा मोाबईलवर डिपी ठेवून त्याच्या नावाने शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. ओमप्रकाश मेघवाल असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा राजस्थानचा रहिवाशी आहे. त्याने राज्यातील एका राजकीय नेत्याच्या स्वीय सहाय्यकाला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्याचा बिष्णोई टोळीशी काहीही संबंध नसल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. धमकीमागे त्याचा काय उद्देश होता, त्याला धमकी देण्यास कोणी प्रवृत्त केले होते का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
यातील तक्रारदार एका राजकीय नेत्याचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात. काही दिवसांपूर्वी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. या व्यक्तीने त्यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्यांनी कॉल कट केला होता. संबंधित मोबाईल क्रमांकाची पाहणी केल्यानंतर या व्यक्तीच्या व्हॉटअप डिपीमध्ये लॉरेन्स बिष्णोईचा फोटो होता. कॉलच्या सुरुवातीलाच त्याने बिष्णेाई टोळीचा उल्लेख करुन त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगून तिथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. गेल्या काही वर्षांत लॉरेन्स बिष्णोईने मुंबई शहरात त्याच्या टोळीची दहशत पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न सुरु केला होता.
त्याचाच एक भाग म्हणून त्याने सिनेअभिनेता सलमान खान आणि सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार केला होता तर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. याच दरम्यान बिष्णोई टोळीकडून काही बॉलीवूड कलाकारांसह व्यापारी, व्यावसायिकांना खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिली जात होती. ही घटना ताजी असताना राज्यातील एका राजकीय नेत्याच्या स्वीय सहाय्यकाला आलेल्या धम्कीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेसह सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. या मोबाईल क्रमांकाची माहिती काढताना त्या क्रमांकाचा सिम राजस्थानमधील एका व्यक्तीच्या नावावर घेतल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांचे एक पथक राजस्थान येथे गेले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ओमप्रकाश मेघवाल याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच तक्रारदार स्वीय सहाय्यकाला शिवीगाळ करुन धमकी दिल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसाकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीतून काही गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.