सिनेअभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ फोटो व्हायरल करुन बदनामी

बदनामीप्रकरणी दिल्लीतील रहिवाशी असलेल्या आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – सिनेअभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचे आक्षेपार्ह अश्‍लील मॉर्फ केलेले फोटो-व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी केल्याप्रकरणी दिल्लीतील एका आरोपीला वांद्रे पोलिसांनी अटक केली. आर्यन दिपक जैन असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा दिल्लीचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. मात्र अटकेनंतर त्याला तेथील लोकल कोर्टात हजर न करता, अटकेची नोटीस न दिल्याने वांद्रे पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे कोर्टाने त्याला जामिनावर सोडून दिले. आर्यन जामिनावर सुटल्याने त्याची पोलिसांना चौकशी करता आली नाही. सोनाक्षीचे आक्षेपार्ह मॉर्फ फोटो व्हायरल करुन तिची बदनामी करण्यामागे त्याचा काय उद्देश होता याचा उलघडा होऊ शकला नाही.

सिनेअभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही वांद्रे येथे राहत असून काही महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला होता. काही दिवसांपूर्वी तिचे काही आक्षेपार्ह मॉर्फ केलेले अश्‍लील फोटोसह व्हिडीओ अज्ञात व्यक्तीकडून सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. त्यातून तिची प्रचंड बदनामी झाली होती. हा प्रकार नंतर सोनाक्षीच्या लक्षात आला होता. या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. अज्ञात व्यक्तीकडून तिचे आक्षेपार्ह मॉर्फ फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी करण्यात आली होती. त्यामुळे तिने तीन दिवसांपूर्वी वांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच त्याचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेल पोलिसांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन तिचे आक्षेपार्ह मॉर्फ फोटोसह व्हिडीओ दिल्लीतून अपलोड झाल्याचे उघडकीस आले होते. त्याचा आयपी अड्रेस पोलिसांना प्राप्त झाला होता. या माहितीनंतर वांद्रे पोलिसांचे एक पथक दिल्लीला गेले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आर्यन जैन याला दिल्लीतील शाहदरा, जगतपुररी येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते.

अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याच्या चौकशीसाठी पोलिसांच्या वतीने तीन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र त्याच्या वकिलांनी त्याच्या पोलीस कोठडीला विरोध केला. आर्यनला अटकेनंतर तेथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले नाही, त्याची ट्रान्झिंट रिमांड घेण्यात आली नाही. त्याला अटकेची नोटीस देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्याच्या अटकेच्या प्रक्रियेवर कोर्टाने प्रश्‍नचिन्ह उपस्थित करुन त्याला जामिनावर सोडून दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page