ऑनलाईन सायबर फ्रॉडसाठी बँक खाती पुरविणार्‍या आरोपीस अटक

धारावीतील राहत्या घरी बॅक खात्याशी संबंधित मुद्देमाल हस्तगत

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – ऑनलाईन सायबर फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक पुरविणार्‍या एका ३६ वर्षांच्या मुख्य आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. वसीम जावेद खान असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी त्याच्या धारावीतील घरातून एक मोबाईल, विविध कंपन्यांचे ३२ सिमकार्ड, दोन मेमरी कार्ड, विविध बँकांचे ३३ एटीएम कार्ड, कंपन्याचे सिमकार्ड असलेले २३ एटीएम कार्ड, तीन बँक पासबुक, बँकेचे ओपनिंग फॉर्म, चार धनादेश, सहा बँक लेटर, बँक खात्याची नोंदवही आणि एक डायरी आदी मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्या चौकशीतून सागर नावाच्या एका व्यक्तीचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यामुळे या गुन्ह्यांत सागरला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

धारावी परिसरात एक तरुण राहत असून तो विविध बँकेत बचत आणि चालू खाते सुरु असून या बँक खात्याची माहिती सायबर ठगांना देतो. याच बँक त्याचा संबंधित सायबर ठगांकडून विविध ऑनलाईन फसवणुक, गेमिंग, सायबर फसवणुकीसाठी वापर होत असल्याची माहिती युनिट आठच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर संबंधित आरोपीची माहिती काढून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस निरीक्षक सावंत, पोलीस उपनिरीक्षक हेमंत मिरजे, पोलीस हवालदार बाराहाते, अतिग्रे, पोलीस शिपाई योगेश सटाले, महिला पोलीस शिपाई जाधव आदी पथकाने धारावीतील थेवरनगरजवळील व्ही. एम थोरात मार्ग, नेहरु सोसायटी ओल्ड इमारतीच्या तळमजल्यावरील रुम क्रमांक एकमध्ये छापा टाकला होता.

या छाप्यात पोलिसांनी वसीम खान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर कपाटात पोलिसांना विविध बँकेचे एटीएम कार्ड, सिमकार्ड, ओपनिंग फॉर्म, बँकेचे लेटर, मेमरी कार्ड, नोंदवही आणि डायरी आदी मुद्देमाल सापडला. चौकशीत वसीम हा तिथे त्याची पत्नी रुबीनासोबत राहत असून काहीच कामधंदा करत नव्हता. काही महिन्यांपूर्वी तो काही सायबर ठगांच्या संपर्कात होता. त्यांच्यासाठी तो विविध बँकेत बचत आणि चालू खाते उघडून देत होता. त्याने विविध बँकेत वेगवेगळ्या नावाने बचत आणि बोगस कंपनीच्या नावाने चालू खाते उघडले होते. बँक खाते ऍक्टिव्ह करण्यासाठी तो सिमकार्ड घेत होता. त्याच सिमकार्डवरुन तो बँक खाते ऍक्टिव्ह करत होता. खाते ऍक्टिव्ह होताच त्याचे सर्व डिटेल्स तो सायबर ठगांना देत होता.

या खात्यांचा सायबर ठग विविध ऑनलाईन फसवणुक, गेमिंग आणि सायबर फसवणुकीसाठी वापर करत होते. बँक खाते उघडण्यासाठी त्याने त्याच्या परिचित काही व्यक्तींचे आधारकार्ड, पॅनकार्डसह इतर दस्तावेज घेतले होते. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कम कमिशन म्हणून दिले होते. त्याने सायबर ठगांना दिलेल्या बँक खात्यात विविध ऑनलाईन फसवणुकीसह गेमिंग आणि सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांतील लाखो रुपये जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या नोंदवही आणि डायरीत त्याचा सविस्तर तपशील आहे. याकामी त्याला सायबर ठगांकडून मोठी रक्कम प्राप्त झाली होती.

हा प्रकार उघडकीस येताच त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत शनिवारी रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. याकामी त्याला सागर नावाच्या एका व्यक्तीने मदत केली होती, त्यामुळे त्याला वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page