प्रायव्हेट सेक्टर-एअरपोर्टमध्ये नोकरीच्या आमिषाने सहाजणांना गंडा
नोकरीसाठी घेतलेले २२.६३ लाख घेऊन आरोपीचे पलायन
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – प्रायव्हेट सेक्टरसह नवी मुंबईतील इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये हमखास नोकरीचे आश्वासन देऊन काका-पुतण्या असलेल्या दोन ठगांनी एका महिलेसह सहाजणांची फसवणुक केल्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात उघडकीस आला आहे. नोकरीसाठी घेतलेले २२ लाख ६३ हजार रुपये घेतल्यानंतर दोन्ही ठग पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी वाकोला पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. साई संजय फातरपेकर आणि सुधाकर फातरपेकर अशी या दोघांची नावे असून या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही बेरोजगार तरुणांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढणयाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
साक्षी अजिंक्य देवस्थळी ही २७ वर्षांची तक्रारदार महिला नालासोपारा येथे राहत असून तिचे पती रत्नागिरी येथे एका खाजगी कंपनी चालक म्हणून काम करतात. ती स्वत नोकरीच्या शोधात होती. त्यामुळे तिचे वडिल तिच्या नोकरीसाठी प्रयत्न करत होते. याच दरम्यान त्यांना सुधाकरविषयी माहिती समजली होती. सुधाकर हा प्रायव्हेट सेक्टरसह नवी मुंबईतील एअरपोर्टमध्ये नोकरी देण्याचे काम करतो. त्याने आतापर्यंत अनेक बेरोजगार तरुणांना नोकरी मिळवून दिली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीच्या नोकरीसाठी सुधाकरला संपर्क साधून तिला नोकरी मिळवून देण्याची विनंती केली होती. यावेळी त्याने तिला नोकरीचे आमिष दाखवून तिचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि शैक्षणिक कागदपत्रे घेतले होते.
या नोकरीसाठी तिने त्याला पावणेदोन लाख रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्याने साक्षीला तीन महिन्यांत नवी मुंबईतील एअरपोर्टवर नोकरीचे आश्वासन दिले होते, मात्र तीन महिने उलटूनही त्याने तिला नोकरी दिली नाही. काही दिवसांनी सुधाकरने तिला चांगल्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तिच्याकडून आणखीन सव्वादोन लाख रुपये घेतले होते. तिच्यासह तिच्या पाच नातेवाईकांनाही त्याने नोकरीचे आमिष दाखविले होते. त्यापैकी ओम सुरेंद्र कनगुटकर याच्याकडून ३ लाख ५८ हजार, चैताली प्रफुल्ल राऊत हिच्याकडून २ लाख ५० हजार, आयुष विश्वास काकड याच्याकडून २ लाख ३० हजार, तेजन मदन गवस व रोहन अनिल पालव याच्याकडून प्रत्येकी ३ लाख रुपये असे सहाजणांकडून एकूण २२ लाख ६३ हजार रुपये घेतले होते.
मात्र कोणालाही नोकरी दिली नाही. याबाबत सुधाकर व त्याचा पुतण्या साईकडे विचारणा केली असता ते दोघेही लवकरच काम होईल असे सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. प्रायव्हेट सेक्टरसह एअरपोर्टमध्ये नोकरीचे आमिष दाखवून साई आणि सुधाकर यांनी सहाजणांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच साक्षीने वाकोला पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर साई आणि सुधाकर या काका-पुतण्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांनी अशाच प्रकारे नोकरीच्या नावाने इतरांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.