शहरात दोन घरफोडीच्या गुन्ह्यांत २१.६० लाखांच्या मुद्देमालाची चोरी
घरफोडीचे गुन्हे दाखल करुन पळून गेलेल्या अज्ञात व्यक्तींचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – शहरात दोन वेेगवेगळ्या घरफोडीच्या घटनेत अज्ञात व्यक्तीने २१ लाख ६० हजारांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मानखुर्द आणि चुन्नाभट्टी पोलिसांनी दोन स्वतंत्र घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करुन परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे. या दोन्ही घरफोडीच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना ९ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चुन्नाभट्टी येथील सिमेंटरी रोड, पंचशीलनगर, शिवकृपा इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर विक्रांत शिवाजी गुंजाळ हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून तिथे त्यांच्या मालकीचे दोन फ्लॅट आहे. ९ नोव्हेबरला दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गुंजाळ कुटुंबिय त्यांच्या जुन्नर येथील वेल्हा गावी गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या घरी लक्ष ठेवण्यास त्यांच्या शेजार्यांना सांगितले होते. गावी गेल्यानंतर ते कोल्हापूर, गणपतीपुळे आदी ठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते. १२ नोव्हेंबरला त्यांच्या शेजारी राहणार्या अक्षता हिने कॉल करुन त्यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाल्याची माहिती सांगितली होती.
या माहितीनंतर गुंजाळ कुटुंबिय गावाहून मुंबईला येण्यासाठी निघाले होते. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता ते त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांना त्यांच्या दोन्ही फ्लॅटचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्व सामान अस्तावस्त पडले होते. कपाटातील विविध सोन्याचे, चांदीचे दागिने आणि बावीस हजाराची कॅश असा १८ लाख ४४ हजाराचा मुद्देमाल चोरी करुन अज्ञात व्यक्तीने चोरी केली होती. या व्यक्तीने फ्लॅटमध्ये खिडकीतून प्रवेश केला होता. खिडकीचे लोखंडी ग्रील तोडणत आले होते. या घटनेनंतर त्यांनी चुन्नाभट्टी पोलिसांना ही माहिती दिली.
या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी विक्रांत गुंजाळ यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. सोसायटीसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसरी घटना मानखुर्द परिसरात घडली. रेखा अजय यादव ही मंडाळा, जनतानगर परिसरात राहत असून पेशंट केअर म्हणून काम करते तर तिच्या पतीचे किराणा मालाचे दुकान आहे. १५ नोव्हेंबरला ती तिच्या कुटुंबियांसोबत घरातील टेरेसवर झोपले होते. रात्री उशिरा तिच्या वरील माळ्यावर येण्यासाठी सिडीचे लोखंडी दरवाजाची बिजागरी तोडून अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला होता. त्यानंतर या व्यक्तीने कपाटातील विविध सोन्याचे दागिने, तीन मोबाईल आणि एक लाख ऐंशी हजाराची कॅश असा तीन लाख सोळा हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. दुसर्या दिवशी हा प्रकार निदर्शनास येताच तिने मानखुर्द पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मानखुर्द पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.