स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ८० लाखांची फसवणुक

अंधेरीतील घटना; चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ एप्रिल २०२४
मुंबई, – विविध बँकेने लिलावात काढलेले गोल्ड स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एका नामांकित ज्वेलरी कंपनीची सुमारे ८० लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चेतन किशोर व्यास व त्याच्या इतर तीन सहकार्‍याविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

कुमार प्रविणसिंग ऊर्फ पियुष जोगेंद्रसिंग राजपुरोहित हे अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहतात. ते अंधेरीतील ओम शिल्पी ज्चेल्स ऍण्ड जेम्स शॉपमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून कामाला आहेत. या शॉपचे मालक किसनभाई जैन, प्रविणभाई जैन असून त्यांनी शॉपची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. चेतन व्यास हा त्यांच्या परिचित असून ते त्याला गेल्या दहा वर्षांपासून ओळखतात. तो सोन्याचा व्यापारी, एजंट आणि ब्रोकर म्हणून काम करतो. चार वर्षांपूर्वी त्यांची चेतनशी भेट झाली होती. या भेटीत त्याने ज्या बँकेने त्यांच्या ग्राहकांना गोल्ड लोन दिले आहे, मात्र ग्राहकांनी लोनची परतफेड न केल्यानंतर बँकेने त्याचे गोल्ड जप्त करुन ते लिलावात काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशा लिलावातील गोल्ड स्वस्तात त्यांना मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याचे अनेक बँक अधिकार्‍यांशी चांगले संबंध असून त्यांच्या मदतीने त्यांना स्वस्तात गोल्ड देण्याचे आमिष दाखविले होते. २०२१ ते २०२३ या कालावधीत त्यांनी त्यांना चार वेळा लिलावात पंधरा लाखांचे गोल्ड स्वस्तात मिळवून दिले होते. त्यामुळे त्यांचा चेतन व्यासवर विश्‍वास बसला होता.

ऑगस्ट २०२३ रोजी चेतन हा पुन्हा त्यांच्या शॉपमध्ये आला होता. त्याने एका बँकेने २३०० ग्रॅम वजनाचे सोने लिलावात काढण्याचा निर्णय घेतला असून ते सर्व गोल्ड त्यांना देण्याचे आश्‍वासन दिले होते. या व्यवहारात त्यांना किमान एक कोटी आठ लाख रुपये फायदा होईल असे सांगितले होते. दिपककुमार सांखला आणि राकेशकुमार कोठारी यांनी संबंधित बँकेकडे २८०० ग्रॅम वजनाचे गोल्ड तारण ठेवून लोन घेतले होते. मात्र या लोनची परतफेड न केल्याने बँकेने ते गोल्ड लिलावात काढण्याचा निर्णय घेतला होता असे सांगितले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी त्याला गोल्डसाठी ८० लाख २७ हजार दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना गोल्ड दिले नाही. वारंवार विचारणा करुनही तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे गोल्डसाठी दिलेल्या पैशांची मागणी केली होती. मात्र ही रक्कम त्यांना परत केली नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी ओशिवरा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे चेतन व्याससह इतर आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी चार आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. चेतन व त्याच्या सहकार्‍यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page