1.48 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी मुख्य आरोपीस अटक

प्रवाशी बोट खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाला घातला गंडा

0

अरुण सावरटकर
5 मार्च 2026
मुंबई, – आखाती देशातील एका प्रवाशी बोटीच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला त्याच्याच परिचित आरोपीने 1 कोटी 48 लाखांची फसवणुक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या मुख्य आरोपीस बोरिवली पोलिसांनी अटक केली. संजय सुभाष नाईक असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता असल्याने त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

तारीक लईक पठाण हे व्यावसायिक असून त्यांचा स्वतचा शिपिंगचा व्यवसाय आहे. सध्या ते त्यांच्या मित्रांसोबत बोरिवली परिसरात राहतात. संजय हा त्यांच्या परिचित असून ते दोघेही एकमेकांना गेल्या एक वर्षांपासून ओळखतात. तो दक्षिण गोवा, जुवारीनगर, सिद्धार्थ कॉलनीचा रहिवाशी आहे. ऑक्टोंबर 2025 रोजी त्यांची भेट झाली होती. यावेळी त्याने त्यांना आबूधाबी नॅशनल ऑईल कंपनीसाठी एक प्रवाशी बोट खरेदी आहे. या बोट खरेदीचा कॉन्ट्रक्ट तुम्ही घेतल्यास, त्यात गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला परतावा मिळेल असे सांगितले. या व्यवसायात त्याला चांगला अनुभव असून ही बोट खरेदी केल्यानंतर ती त्यांनी आबूधाबी नॅशनल ऑईल कंपनीमध्ये लावल्यास त्यांना नक्कीच चांगला फायदा होईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता.

त्याच्या या आमिषाला बळी पडून त्यांनी सुरुवातीला त्याला तेवीस लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्यांनी कंपनीकडून कॉन्ट्रक्ट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. दुसरीकडे त्यांनी ती बोट खरेदी करण्यासाठी संजय नाईक त्यांना सतत दबाव आणत होता. त्यांनी बोट खरेदी न केल्यास त्यांना मोठा आर्थिक दंड भरावे लागेल अशी भीती घालत होता. मात्र वेळेत हा व्यवसाय न झाल्याने या कंपनीकडून त्यांना ब्लॅकलिस्ट होण्यापासून वाचण्यासाठी त्यांनी दिड लाख युएस डॉलरची दंडाची रक्कम कंपनीत जमा केली होती. मात्र मदतीचे आश्वासन देऊन संजयने बोट खरेदीसाठी काही प्रयत्न केले नाही. त्याच्याकडे प्रत्येक वेळेस वेगवेगळे कारण सांगितले जात होते.

हा व्यवहार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्या 23 लाखांसह कंपनीत जमा केलेल्या दंडाची दिड लाखांची युएस डॉलरची (सव्वाकोटी रुपये ) मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्यांना पैसे परत केले नाही. ऑक्टोंबर 2025 आणि जानेवारी 2026 या कालावधीत संजयने त्यांना बोट खरेदी करण्यास प्रवृत्त करुन त्यांच्याकडून भारतीय तसेच युएस डॉलर असे 1 कोटी 48 लाख रुपये घेतले होते. मात्र बोट खरेदीचा व्यवहार पूर्ण न करता त्यांनी दिलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बोरिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी संजय नाईकविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सोमवारी 2 मार्चला बोरिवली पोलिसांच्या एका विशेष पथकने संजय नाईकला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता.

याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. संजय हा व्हाईट कॉलर गुन्हेगार असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकाचीं फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page