मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ एप्रिल २०२४
मुंबई, – बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेटनिस्ट म्हणून परिचित असलेला सिनेअभिनेता आमीर खान याच्या डिपफेक व्हिडीओप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खार पोलिसांनी भादवीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा खार पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. लवकरच आमीरचा बोगस व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन त्याची बदनामी करणार्या आरोपीला अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर आमीर खान याचा एक डिपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. २७ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये तो एका राजकीय पक्षाचा प्रचार करत असताना दिसत असून मतदारांनी जुमलापासून दूर राहण्याबाबत आवाहन करत आहे. मूळात आमीर खान याने कधीही कुठल्याही पक्षाचा प्रचार केला नव्हता. काही वर्षांपूर्वी आमीर खानचा एक बहुचर्चित कार्यक्रम एका खाजगी वाहिनीवर दाखविण्यात येत होता. या कार्यक्रमातील काही सीन घेऊन अज्ञात व्यक्तीने त्यात फेरफार केले होते. त्यानंतर त्याच्या डिपफेक व्हिडीओ तयार करुन तो सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. गेल्या वेळेच्या निवडणुकीदरम्यान आमीरने संपूर्ण देशवासियांना मतदान करण्याचे आवाहन करुन जनजागृती केली होती. मात्र जनजागृती करताना त्याने कुठल्याही पक्षाचा प्रचार होईल असे वक्तव्य केले नव्हते. तरीही त्याच्या डिपफेक व्हिडीओ गैरवापर करुन तो एका पक्षाचा प्रचार करत असल्याचे दाखविण्यात आले होते. हा प्रकार अलीकडेच आमीर खानच्या निदर्शनास आला होता. हा व्हिडीओ फेक असल्याचे लक्षात येताच त्याच्या वतीने त्याच्या प्रवक्त्याने खार पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ४१९, ४२० भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा खार पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. या तक्रारीनंतर आमीर खानच्या वतीने त्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमीर खानने यापूर्वी निवडणुक आयोगसाठी एक जनजागृती मोहीम केली होती. मात्र आमीरकडून कधीही कुठल्याही पक्षाचा प्रचार झाला नव्हता. गेल्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत आमीरने कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन केले नाही. या डिपफेक व्हिडीओमुळे आमीरला प्रचंड धक्का बसला होता. त्यामुळे तो व्हिडीओ पूर्णपणे खोटा असून असत्य आहे असेही या प्रवक्त्याने बोलताना सांगितले.