सायबर ठगांना तीनशेहून अधिक सिमकार्ड पुरविणारा एजंट गजाआड

सिमकार्डचा ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांत वापर झाल्याचे उघड

0

अरुण सावरटकर
12 मार्च 2026
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीसाठी सायबर ठगांना विविध व्यक्तीच्या आधारकार्डचा गैरवापर करुन तीनशेहून अधिक सिमकार्ड पुरविणार्‍या एअरटेल आणि व्हीआयचा पीओएस एजंट असलेल्या कमल पुकराज कुलदीप या 25 वर्षांच्या आरोपी तरुणाला उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. त्याने दिलेल्या सिमकार्डचा विविध ऑनलाईन फसवणुकीसाठी वापर झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यातील एका सिमकार्डवरुन गोरेगाव येथील एका वयोवृद्धाला डिजीटल अरेस्टची धमकी देऊन त्यांची सायबर ठगांनी सुमारे 29 लाखांची फसवणुक केली होती. या गुन्ह्यांचा तपास करताना कमल कुलदीपचा हा प्रताप उघडकीस आल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

66 वर्षांचे मोहन भिकाजी गावकर हे गोरेगाव येथे राहत असून ते वेस्टर्न रेल्वेच्या अकाऊंट विभागातून सहाय्यक अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहे. 10 डिसेंबर 2025 त्यांना एक व्हिडीओ कॉल आला होता. त्यांनी तो कॉल घेतल्यानंतर समोर एक पोलीस गणवेशात असलेला व्यक्ती दिसला. या व्यक्तीने त्याचे नाव रणजीतकुमार असून तो मुंबई पोलीस दलात कामाला आहे असे सांगितले. त्यांच्या आधारकार्डवर एक सिम घेण्यात आले असून त्यांना लखनऊ एटीएसला तक्रार करावी लागेल असे सांगून त्याने त्यांचा कॉल एटीएस कंट्रोल रुमला ट्रान्स्फर केला होता. यावेळी त्याच्याशी प्रेमकुमार गौतम नावाच्या पोलीस अधिकार्‍याने संभाषण केले. त्याने त्यांच्या सिमवर अज्ञात व्यक्तीने दुसरा मोबाईल घेतला आहे. त्यांची तक्रार नोंदवून घेतल्याचे भासवून त्याने कॉल बंद केला.

काही वेळानंतर त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला. त्याने तो एटीएस प्रमुख सदानंद दाते असल्याचे सांगून तो लखनऊ येथून बोलत असल्याचे सांगितले. या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता, मात्र त्याचा आवाज ऐकू येत होते. त्याने त्यांच्या आधारकार्डवरुन एका बँकेत खाते उघडण्यात आले असून या खात्यात मनी लॉड्रिंगची सुमारे 60 कोटी रुपये जमा झाले आहेत. याच खात्यात वेगवेगळ्या बँक खात्यात ऑनलाईन व्यवहार झाले आहे. त्यातून त्यांना दहा टक्के कमिशन मिळाल्याचे त्यांच्याकडे भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मनी लाड्रिंगसह मानवी तस्करीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यांत किमान दहा वर्ष शिक्षा होऊ शकते. त्यामुळे त्यांना डिजीटल अरेस्ट करण्यात आली आहे. त्यांना घराबाहेर जाता येणार नाही, कोणाशी बोलता येणार नाही.

त्यांच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचे लक्ष असेल असे सांगून त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दिलेल्या नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांना त्यांच्या घरात येऊन अटक होऊ शकते असे असे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांना एनआयए लोगो, रिझर्व्ह बँक, आरबीआय एक्झिक्युटिव्ह संचालक केसवन रामचंद्रन यांच्या नावाचे लेटर पाठवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बँक खात्यासह गुंतवणुकीची माहिती काढून त्यांना काही बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले. अटकेची भीतीने त्यांनी त्यांना सुमारे 29 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर त्यांनी त्यांना दर दोन तासांनी आय एम सेफ फोर नॅशनल सिक्युरिटी असा मॅसेज पाठविण्यास सांगितले. त्यामुळे ते त्यांना व्हॉटअपवर मॅसेज पाठवत होते. चौकशी झाल्यानंतर त्यांनी त्यांचे पैसे पुन्हा बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी पैसे ट्रान्स्फर केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी उत्तर सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुक करणे तसेच आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. तपासात फसवणुकीसाठी वापरण्यात आलेला सिमकार्ड संबंधित व्यक्तीच्या परवानगीशिवाय देण्यात आला होता. त्याच्या आधारकार्डचा गैरवापर करुन सिमकार्ड देऊन त्याचा फसवणुकीसाठी वापर केला होता.

या व्यक्तीने अशाच प्रकारे तीनशेहून अधिक सिमकार्ड अ‍ॅक्टिव्ह करुन गुन्ह्यांतील सायबर ठगांना दिले होते. या सर्व सिमकार्डचा सायबर ठगांनी वेगवेगळ्या फसवणुकीसाठी वापर केला होता. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाचंगणे, खेतरे, पोलीस उपनिरीक्षक बहिरे, पोलीस हवालदार रविंद्र पाटील, पोलीस शिपाई गणेश कोरे यांनी तांत्रिक माहितीवरुन कमल कुलदीप याला चेंबूर येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत कमल हा चेंबूरच्या शितलामाता मंदिर जवळील आदर्शनगर, ठक्कर बाप्पा कॉलनीत राहतो. तो एअरटेल आणि पीआयमध्ये पीओएस एजंट म्हणून काम करत होता. त्याच्याकडे अनेकांनी सिमकार्डसाठी त्यांचे आधारकार्ड दिले होते. याच आधारकार्डवरुन त्याने वेगवेगळ्या नावाने आणि फोटोचा वापर करुन एअरटेल आणि व्हीआय कंपनीतून तीनशेहून अधिक सिमकार्ड घेतले होते.

ते सिमकार्ड त्याने सायबर ठगांना पुरविले होते. याकामासाठी त्याला मोठी रक्कम कमिशन म्हणून मिळाली होती. त्याने दिलेल्या सिमकार्डचा सायबर ठगांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांत वापर करुन अनेकांना कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page