गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा घालणार्या हॉटेल व्यावसायिकाला अटक
हॉटेल व्यवसायाच्या गुंतवणुकीसाठी सोळाकडून घेतले १.६४ कोटी रुपये
राजू परुळेकर
२० एप्रिल २०२४
मुंबई, – हॉटेल व्यवसायातील गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदर देण्याचे आमिष दाखवून सोळा गुंतवणुकदारांची १ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी सलमान याकूब घडिया या हॉटेल व्यावसायिकाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. सलमानने हॉटेल व्यवसायाच्या गुंतवणुकीच्या नावाने अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जात असून फसवणुकीचा हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अटकेनंतर सलमानला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
मुंबई महानगरपालिकेत कामाला असलेले मोहम्मद सलीम राहत हुसैन खान हे माहीम येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. सध्या ते विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयातात वरिष्ठ नोंदणी सहाय्यक म्हणून काम करतात. तीन वर्षांच्या त्यांच्या परिचित नातेवाईकांनी त्यांची ओळख सलमान घडिया याच्याशी करुन दिली होती. सलमान हा जोगेश्वरी येथे राहत असून त्याने कॅफे राजस्थान नावाचे एक हॉटेल भाड्याने चालविण्यासाठी घेतले होते. हॉटेल व्यवसाय वाढीसाठी त्याला काही गुंतवणुकदाराची गरज होती. या गुंतवणुकीवर त्याने त्यांना आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे मोहम्मद सलीमने त्याच्या व्यवसायात आधी दहा लाख आणि काही महिन्यानंतर पुन्हा दहा लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीनंतर त्याने त्यांना काही महिने व्याजाची रक्कम दिली होती. फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांन पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने सलमानकडे काही रक्कम परत करण्याची विनंती केली. यावेळी त्याने त्यांना चार लाख रुपये परत केले होते. मात्र त्यानंतर त्याने त्यांना गुंतवणुकीवर व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याच्याकडे उर्वरित पैशांची मागणी केली होती. मात्र वारंवार मागणी करुनही त्याने त्यांना पैसे दिले नाही. त्याने दिलेला पाच लाखांचा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. मे २०२३ रोजी त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. त्याचा त्याच्या राहत्या घरासह हॉटेलमध्ये शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. हॉटेल बंद करुन सलमान हा पळून गेल्याचे लक्षात येताच त्यांना धक्काच बसला होता.
बुधवारी १७ एप्रिलला ते ओशिवरा पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी तिथे इतर पंधरा लोक होते. चौकशीदरम्यान सलमानने त्यांनाही हॉटेल व्यवसायात गुंतवणुकीस प्रवृत्त करुन त्यांच्याकडून १ कोटी ४६ लाख रुपये घेतले होते. या सर्वांना ठराविक महिने व्याजाची रक्कम दिल्यानंतर त्याने व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. तो त्यांच्या संपर्कात नव्हता. अशा प्रकारे मे २०२१ ते एप्रिल २०२४ या कालावधीत सलमानने हॉटेल व्यवसायासाठी पंधराजणांकडून गुंतवणुकीसाठी १ कोटी ६० लाख ६५ हजार रुपये घेतले, मात्र ही रक्कम परत न करता त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांच्या वतीने मोहम्मद सलीम खान यांनी ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सलमानविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सलमानच्या अटकेचे आदेश ओशिवरा पोलिसांना दिले होते.
या आदेशानंतर ओशिवरा पोलिसांच्या एका विशेष पथकाने पळून गेलेल्या सलमान घडिया याला काही तासांत अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सलमानने अशाच प्रकारे इतर काही लोकांकडून पैसे घेतल्याचे तपासात उघडकीस आले असून फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्याकडून फसवणुक झालेल्या लोकांनी ओशिवरा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.