म्हाडा फ्लॅटसाठी घेतलेल्या ६८ लाख रुपयांचा अपहार

एलआयसीच्या महिलेसह पोलीस अधिकार्‍याची फसवणुक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ एप्रिल २०२४
मुंबई, – बोगस कागदपत्रांच्या मदतीने म्हाडा फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे ६८ लाखांचा अपहार करुन एलआयसीच्या एका प्रशासकीय अधिकारी महिलेसह मुंबई पोलीस दलातील सहाय्यक फौजदार अधिकार्‍याची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रशांत मेस्त्री या एजंटविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. प्रशांतने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जात असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

वैभवी गिरीश हरमलकर ही महिला डोबिंवलीतील कुंभारखानपाड्यात राहत असून एलआयसीमध्ये सहाय्यक प्राशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. डोबिंवलीपूर्वी हरमलकर कुटुंबिय चिंचपोकळीतील तांबावाला इमारतीमध्ये राहत होते. तिचे घर लहान होते, त्यात वडिलांच्या निधनाने तिला तिच्या आईला स्वतकडे राहण्यासाठी आणायचे होते. त्यामुळे चार वर्षांपूर्वी ती तिच्या पतीसोबत नवीन फ्लॅटच्या शोधात होते. यावेळी त्यांनी लालबाग परिसरात घर घेण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान ऑनलाईन प्रॉपटी पाहत असताना तिला एका साईटवर प्रशांत मेस्त्रीचा मोबाईल क्रमांक सापडला होता. त्यामुळे तिने त्याला संपर्क साधून लालबाग परिसरात फ्लॅट विकत घेण्याबाबत सांगितले होते. जुलै २०२० वैभवी ही तिचे पती गिरीशसोबत प्रशांतच्या लालबाग येथील कार्यालयात गेली होती. यावेळी त्याने लालबाग, काळाचौकी आणि घोडपदेव येथे ५० ते ६० लाखांमध्ये काही फ्लॅट उपलब्ध असल्याचे सांगितले होते. याच दरम्यान त्याने त्यांना करीरोडच्या सुखकर्ता इमारतीमध्ये म्हाडाचा फ्लॅट दाखविला होता. फ्लॅट पसंद पडल्याने तिने सत्तरऐवजी साठ लाखांमध्ये फ्लॅट खरेदी करण्यास आपण इच्छुक असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यात ६० लाखांमध्ये सौदा पक्का झाला होता.

२३ सप्टेंबर ते ७ डिसेंबर २०२० या कालावधीत तिने त्याला फ्लॅटसाठी पन्नास लाखांचे पेमेंट केले होते. त्यानंतर त्यांना फ्लॅटचे कागदपत्रे देण्यात आले होते. त्यात संक्रमण शिबीरातील गाळा बदलून फ्लॅट देत असल्याचे नमूद करण्यात आले होते आणि ती कागदपत्रे म्हाडाकडून देण्यात आल्याचे प्रशांतने सांगितले होते. मात्र कोरोना काळात त्यांच्यातील व्यवहार बंद झाला होता. त्यामुळे तिला फ्लॅटचा ताबा मिळाला नव्हता. काही दिवसांनी प्रशांतने तिचे कॉल घेणे बंद केले, लालबागचे कार्यालय बंद करुन तो निघून गेला होता. दिलेल्या मुदतीत प्रशांतने फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. त्यामुळे तिला संशय निर्माण झाला होता. त्यामुळे तिने फ्लॅटच्या कागदपत्रांची शहानिशा केली असता ते सर्व कागदपत्रे बोगस होती. म्हाडाने अशा प्रकारे कुठलेही कागदपत्रे तिच्या नावाने दिले नव्हते.

अशाच प्रकारे प्रशांतने मुंबई पोलीस दलात सहाय्यक फौजदार असलेल्या सुनिल शांताराम सावंत यांनाही सुखकर्ता इमारतीमध्ये फ्लॅट देतो असे सांगून त्यांच्याकडून १८ लाख ५० हजार रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनाही फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. अशा प्रकारे प्रशांतने म्हाडा फ्लॅटच्या नावाने बोगस कागदपत्रे देऊन त्यांच्याकडून ६८ लाख ५० हजार रुपये घेतले होते. मात्र फ्लॅटचा ताबा न देता पैशांचा अपहार करुन वैभवी हरमलकर आणि सुनिल सावंत यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच वैभवी हरमलकर यांनी काळाचौकी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रशांत मेस्त्रीविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत तपास सुरु असून लवकरच प्रशांतची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page