मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ एप्रिल २०२४
मुंबई, – शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने एका महिलेची ऑनलाईन फसवणुक कटातील एका वॉण्टेड सायबर ठगाला धारावी पोलिसांच्या विशेष पथकाने राजस्थानातून अटक केली. रामावतार रामधन मीना असे या २६ वर्षीय ठगाचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याच्या इतर सहकार्यांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
यातील तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत धारावी परिसरात राहते. ११ मार्च ते १३ मार्चदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने तिला शेअरमध्ये गुंतवणुकीवर आकर्षक परवाता देतो असे सांगून शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. या आमिषाला बळी पडून तिने त्याने दिलेला क्यूआर कोड स्कॅन करुन एक लाख तेरा हजार रुपये पाठवून दिले होते. मात्र या गुंतवणुकीवर तिला कुठलाही परतावा मिळाला नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने धारावी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, सहाय्यक पोलीस आयुक्त गोविंद गंभीरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरीक्षक विकास भारमल, पोलीस उपनिरीक्षक सागर खाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद पांडेय, पोलीस शिपाई कुंभार, पोलीस हवालदार विनोद पवार यांनी तपास सुरु केला होता.
ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्यासह मोबाईल क्रमांक आणि ईमेल प्राप्त करुन पोलिसांनी मोबाईचे सीडीआर काढले होते. त्यावरुन ही फसवणुक राजस्थानातून झाल्याचे उघडकी आले होते. त्यानंतर या पथकाने सवाई मधावपूर येथून रामावतार मीना या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या चौकशीत त्याचा गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल, दोन सिमकार्ड आणि दोन वेगवेगळ्या बँकेचे पासबुक जप्त केले. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. रविवारी दुपारी त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शेअरमध्ये चांगला परवाता देण्याचे आमिष दाखवून फसवणुक करणारी ही एक टोळी असून या टोळीतील इतर काही सहकार्यांचे नाव समोर आली आहेत. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.