मैत्रिणीविरुद्ध भडकावतो म्हणून सोळा वर्षांच्या मुलाची हत्या

हत्येचा गुन्हा दाखल होताच मित्राला दिवा येथून अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ एप्रिल २०२४
मुंबई,  – मैत्रिणीविरोधात नरात्मक बोलून, सतत आक्षेपार्ह विधान करुन भडकाविण्याचा तसेच तिच्यापासून दूर राहण्याचा सल्ला देणार्‍या श्रवण गणेश साळवे या सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाची त्याच्याच मित्राने धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपी मित्राला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. ऋषिकेश गुरव असे या १९ वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला घाटकोपर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे यांनी सांगितले.

गणेश सुडकाजी साळवे हे विक्रोळीतील पार्कसाईट, संजय गांधी नगर, त्रिलोक सोसायटीमध्ये राहतात. ते सध्या इंडियन ऑईन गॅस कंपनीत गॅस डिलीव्हरी बॉयचे काम करतात तर त्यांचा मोठा मुलगा विघ्नेश हा एका खाजगी कंपनीत कामाला आहे. श्रवण हा त्यांचा लहान मुलगा असून तो सध्या शिक्षण घेत आहे. भांडुप परिसरातील महानगरपालिकेच्या रात्रशाळेत तो नववीत शिकत होता. २१ एप्रिलला सुट्टी असल्याने तो दिवसभर घरी होता. सायंकाळी चार वाजता मित्रांना भेटायला जातो असे सांगून श्रवण घरातून निघून गेला. रात्री नऊ वाजता त्यांना घाटकोपर पोलीस ठाण्यातून एक कॉल आला होता. त्यांनी त्यांच्या मुलाविषयी माहिती सांगून त्यांना राजावाडी रुग्णालयात बोलावून घेतले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना शवागृहात नेण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना रक्ताने माखलेला एक मृतदेह दाखविला असता तो मृतदेह त्यांचा मुलगा श्रवण यांचा होता. चौकशीदरम्यान श्रवण हा घाटकोपरच्या गोळीबार रोड, इंदिरानगर, सूर्यमुती साईबाबा मंदिराजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ही माहिती समजताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्याच्या डोळ्यावर, छातीवर, मानेवर, मनगटावर तसेच हातावर धारदार शस्त्राने मारहाण केली होती. या मारहाणीत तो गंभीररीत्या जखमी झाला होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गणेश साळवे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.

या गुन्ह्यांत संमातर तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करत होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आसपासच्या परिसरात चौकशी सुरु केली होती. प्राप्त सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक मााहितीवरुन श्रवणसोबत त्याचा मित्र ऋषिकेश गुरव होता, मात्र या घटनेनंतर तो अचानक पळून गेला होता. भांडुप येथून काही दिवसांपूर्वी गुरव कुटुंबिय दिवा येथे शिफ्ट झाले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी दिवा येथे एक टिम पाठविण्यात आली होती. त्याचा शोध सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे व त्यांच्या पथकाने अवघ्या काही तासांत दातिवली येथून ऋषिकेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच श्रवणची हत्या केल्याची कबुली दिली. ऋषिकेशची एक मैत्रिण असून तिच्याविषयी श्रवण नेहमी त्याला भडकावत होता. सतत आक्षेपार्ह विधान करुन तिच्यापासून लांब राहण्याचा सल्ला देत होता. त्याच्या त्याच्या मनात राग होता. त्यामुळे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता त्याने श्रवणला सूर्यमूखी साईबाबा मंदिराजवळ आणले आणि तिथे धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करुन तो पळून गेला होता. हत्येनंतर तो घाटकोपर येथून दिवा येथील घरी गेला होता. अटकेच्या भीतीने तो घरातून पळून गेला आणि एका मित्राच्या घरी लपला होता. मात्र त्याला गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासांत गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी कुठलाही पुरावा नसताना शिताफीने अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी घाटकोपर पोलिसांच्या स्वाधीन करणयात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, पोलीस उपनिरीक्षक रामदास कदम, स्वप्निल काळे, महेश शेलार, नामदेव परबळकर, सहाय्यक फौजदार तानाजी उबाळे, पोलीस हवालदार राजाराम कदम, संतोष गुरव, शशिकांत कांबळे, अजय बल्लाळ, विनोद पांडे, सचिन गलांडे, पोलीस शिपाई विकास होनमाने, महेश सावंत यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page