शेतात सोन्याची विट सापडल्याची बतावणी करुन व्यवसायिकाला गंडा

फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ मार्च २०२४
मुंबई, – शेतात काम करताना अडीच किलोची सोन्याची विट सापडल्याची बतावणी करुन गावात ही माहिती आपण कोणालाही सांगू शकत नाही, त्यामुळे सोन्याची ती विट स्वस्तात देतो असे सांगून एका गॅरेज व्यावसायिकाला २१ लाखांना गंडा घालून पळून गेलेल्या कटातील एका वॉण्टेड आरोपीस आसाम येथून सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. शफीकुल अक्काशअली इस्लाम असे या आरोपीचे नाव असून तो आसामच्या लखीमपूर, बिहपूरीयाचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून गुन्ह्यांतील २० लाख रुपयांची कॅश पोलिसांनी जप्त केली आहे. अटकेनंतर शफीकूलला वांद्रे येथील लोकल कोर्टाने बुधवार २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर दोघांचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

मोहम्मद तहसीन हसीन खान हे सांताक्रुज येथे राहत असून त्यांच्या मालकीचे एक गॅरेज आहे. डिसेंबर २०२२ रोजी त्यांची राजूअली कुदूसअलीशी ओळख झाली होती. तो सांताक्रुज येथे एका इमारतीच्या बांधकाम साईटवर बिगारी कामगार म्हणून काम करत होता. त्याला ऑटोमोबाईल मॅकेनिकचे काम शिकायचे होते, त्यामुळे त्याने त्यांना तिथे काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती केली होती. त्याला शिकण्याची आवड असल्याचे समजून त्यांनी त्याला त्यांच्या गॅरेजमध्ये ठेवले होते. दिवसा बांधकाम साईटवर काम करुन तो सायंकाळी त्यांच्या गॅरेजमध्ये शिकण्यासाठी येत होता. एक महिना काम केल्यानंतर राजू हा त्याच्या आसाम येथील गावी निघून गेला होता. डिसेंबर २०२३ रोजी त्याने त्यांना फोन करुन तो मुंबईत येणार नसून गावीच शेती करणार आहे असे सांगितले होते. त्याला शेतात काम करताना अडीच किलो सोन्याची विट सापडली आहे. याबाबत तो गावात कोणालाही काहीही सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही ती सोन्याची विट खरेदी करा. ती विट त्याने त्यांना स्वस्तात देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांचा विश्‍वास बसावा म्हणून त्याने काही फोटो आणि व्हिडीओ पाठवून त्यांना आसाम येथे बोलाविले होते. मात्र आसाम येथील त्याच्या गावी जाणे त्यांना शक्य नसल्याने त्याने त्यांना कोलकाता येथे सॅम्पल घेऊन येतो असे सांगितले. सोन्याची खात्री करण्यासाठी ते कोलकाता येथे गेले होते.

११ डिसेंबरला कोलकाता येथे राजूसह त्याचे दोन मित्र बाबूल आणि राजू भेटले. त्यांनी त्यांना सोन्याची विट दिली. त्यातील पाच मिलिग्राम तुकडा काढून त्यांनी एका ज्वेलर्स व्यापार्‍याला दाखविले होते. यावेळी या व्यापार्‍याने ते सोने २२ कॅरेट असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी राजूकडून सोन्याची ती विट घेण्याचा निर्णय घेतला होता. चर्चेअंती त्यांच्यात २२ लाखांमध्ये सौदा पक्का झाला होता. त्यामुळे त्यांनी राजूच्या सांगण्यावरुन पाच विविध बँक खात्यात ही रक्कम जमा केली होती. ८ जानेवारीला ती विट घेऊन ते कुर्ला येथील मराठा ज्वेलर्स दुकानात घेऊन गेले होते. यावेळी या व्यापार्‍याने ते सोने बोगस असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी राजूला फोन करुन याबाबत विचारणा केली असता त्याने त्यांच्याकडे आणखीन २६ लाखांची मागणी केली. ही रक्कम दिल्यानंतर खरे सोने देईल असे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांच्या कॉलला प्रतिसाद देणे बंद केले होते.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सांताक्रुज पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी राजूसह त्याच्या दोन्ही मित्रांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला होता. गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस आयुक्त महेश मुगुटराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे, पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय कल्हाटकर, पोलीस शिपाई बागल, अस्वले, सुरवसे यांनी आसाम येथून शफीकूलला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने त्याच्या मित्रांसोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील २० लाखांची कॅश हस्तगत केली आहे. दहा दिवसांचा ट्रॉन्झिंट रिमांड घेतल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page