तापी नदीत फेंकून दिलेली एक पिस्तूल सापडली

दुसर्‍या पिस्तूलसाठी गुन्हे शाखेची ऑपरेशन सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ मार्च २०२४
मुंबई, – गेल्या आठवड्यात वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ दबंग सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळ गोळीबार करुन गुन्ह्यांत वापरलेले दोन्ही पिस्तूल तापी नदीत फेंकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या शूटरच्या मदतीने अखेर गुन्हे शाखेने एक पिस्तूल ताब्यात घेतली आहे तर दुसर्‍या पिस्तूलसाठी ऑपरेशन सुरु असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी गुन्हे शाखेचे एक विशेष पथक दोन्ही शूटरसह सुरतला गेले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांसह मच्छिमाराच्या मदतीने ही कारवाई केली. हीच पिस्तूल शूटरविरुद्ध कोर्टात भक्कम पुरावा ठरणार असल्याचा दावा गुन्हे शाखेकडून करण्यात आला.

१४ एप्रिलला दोन बाईकस्वारांनी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ पाच ते सहा गोळ्या फायर केल्या होत्या. गोळीबारानंतर ते दोघेही पळून गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर पाल या दोन्ही शूटरला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी भूज येथून अटक केली होती. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. चौकशीदरम्यान या दोघांना गोळीबारासाठी दोन पिस्तूल देण्यात आले होते. घटनेच्या वेळेस विकीकुमार बाईक चालवत होता तर सागरकुमारने सलमानच्या घराजवळ पाच ते सहा गोळ्या फायर केल्या होत्या. गोळीबारानंतर ते दोघेही पळून गेले होते. पुरावा नष्ट करताना त्यांनी मुंबईहून गुजरातला जाताना तापी नदीत दोन्ही पिस्तूल फेंकून दिले होते.

गोळीबार प्रकरणात न्यायवैधक प्रयोगशाळेचा अहवाल एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो. त्यामुळे त्या पिस्तूलचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी सकाळी गुन्हे शाखेचे बारा ते पंधराजणांचे एक पथक गुजरातच्या तापी नदीजवळ दोन्ही आरोपींना घेऊन गेले होते. आरोपींच्या माहितीनंतर सुरत पोलिसांच्या मदतीने गुन्हे शाखेने काही मच्छिमाराच्या सहाय्याने ते पिस्तूल शोधण्याचा प्रयत्न केला. सायंकाळपर्यंत ही शोधमोहीम सुरु होती. रात्री उशिरा एक पिस्तूल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे आता दुसर्‍या पिस्तूलचा शोध सुरु आहे. तापी नदीची खोली अरुंद आणि सतत वाहते पाणी असल्याने ते पिस्तूल शोधणे गुन्हे शाखेसाठी एक आव्हान आहे. मंगळवारी पुन्हा गुन्हे शाखेचे अधिकारी मच्छिमाराच्या मदतीने ते पिस्तूल शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page