मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ मार्च २०२४
ठाणे, – घातक शस्त्रांसह एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठाण्याच्या वागळे गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. शेरबहादूर नवबहादूर कारकी असे या गुन्हेगाराचे नाव असून तो मूळचा चंदीगडचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्याच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याची मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत विक्री होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. या घातक शस्त्रांचा विविध गंभीर गुन्ह्यांत वापर होत असल्याने अशा शस्त्रांची तस्करी करणार्या आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने अशा आरोपींविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम ुसरु असातनाच ठाण्यातील वागळे इस्टेट, नटवर हॉटेलजवळ काहीजण इतर राज्यातून आणलेल्या शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक सुनिल अहिरे, पोलीस हवालदार सुनिल रावते, माधव वाघचौरे, सुशांत पालांडे, अजय साबळे, विजय पाटील, महिला पोलीस हवालदार मिनाक्षी मोहिते, पोलीस नाईक गार्डे, तेजस ठाणेकर यांनी सोमवारी नटवर हॉटेलजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. दुपारी तिथे शेरबहादूर कारकी आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे सापडले. त्याच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. तपासात तो घातक शस्त्रांची विक्रीसाठी आला होता. त्याने ते शस्त्रे कोठून आणली, ती शस्त्रे तो कोणाला विक्री करणार होता याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
दुसरीकडे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. शस्त्रांची विक्री करणार्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. अशा आरोपीविरुद्ध पोलिसांनी विशेष नजर असल्याचे सांगितले. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले की, शेरबहादूर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हत्येच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अकरा वर्ष तो जेलमध्ये होता. तिथे त्याची काही आरोपीशी ओळख झाली होती. त्यानेच त्याला घातक शस्त्रांची खरेदी-विक्रीचा सल्ला दिला होता. त्यातून त्याला चांगला फायदा होईल असे सांगितले होते. त्यामुळे जामिनावर बाहेर येताच त्याने शस्त्रांची विक्री सुरु केली होती. त्याने ते शस्त्रे कोणाला देण्यासाठी आणले होते याचा तपास सुरु आहे. या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्याने यापूर्वीही शस्त्रांची खरेदी-विक्री केली आहे का याचा तपास सुरु असल्याचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले.