अस्तित्वात नसलेल्या म्हाडा फ्लॅटसाठी पैसे घेऊन फसवणुक
बोरिवलीतील घटना; म्हाडा एजंटविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ मार्च २०२४
मुंबई, – अस्तित्वात नसलेल्या म्हाडा फ्लॅटचे ऍलोटमेंट लेटर देऊन एका तरुणीकडून घेतलेल्या साडेआठ लाखांचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गणेश विठ्ठल दळवी या म्हाडा एजंटविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. गणेशने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
कविता काशिविश्वनाथ दुराई ही २९ वर्षांची तरुणी बोरिवलीतील कांदिवली व्हिलेज परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. ऑगस्ट २०२२ रोजी तिच्याच परिसरात राहणार्या गणेशने तिला कांदिवलील महावीरनगर परिसरात म्हाडाचे चार फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असून तिला एक फ्लॅट ४२ लाखांमध्ये मिळवून देतो असे सांगितले होते. ती भाड्याच्या रुममध्ये राहत असल्याने तिने स्वस्तात म्हाडाचा फ्लॅट मिळत असल्याने त्याला होकार दिला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याला टप्याटप्याने साडेआठ लाख रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर त्याने तिला तिच्या नावाने म्हाडाच्या लेटरहेडवर बी/५०३ क्रमांकाच्या फ्लॅटचे ऍलोटमेंट लेटर व्हॉटअपवर पाठवून दिले होते. फ्लॅटचा ताबा तिला डिसेंबर २०२२ रोजी मिळणार होता. त्यामुळे ती म्हाडाच्या इमारतीमध्ये तिच्या फ्लॅटची पाहणी करण्यासाठी गेली होती. यावेळी तिला तिथे बी/५०३ क्रमांकाचा फ्लॅट नसल्याचे समजले. म्हाडा कार्यालयात ऍलोटमेंट लेटरविषयी चौकशी केली असता म्हाडाने तिच्या नावावर कुठलाही फ्लॅट ऍलोट केला नसल्याचे सांगण्यात आले.
अस्तिस्वात नसलेल्या म्हाडा फ्लॅटचे ऍलोटमेंट देऊन गणेशने तिच्याकडून फ्लॅटसाठी साडेआठ लाख रुपये घेऊन तिची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने गणेशकडून पैशांची मागणी सुरु केली होती, मात्र त्याने पैसे न देता तिची फसवणुक केली होती. त्यामुळे तिने बोरिवली पोलिसांत गणेशविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून गणेश दळवीचा शोध सुरु केला आहे.