मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ मार्च २०२४
मुंबई, – चाळीच्या पुर्नविकासाला विरोध करुन घर खाली करण्यास नकार देणार्या सुबोध राघोजी सावंत या भावाची त्याच्याच मोठ्या भावाने हत्या ेकेल्याची घटना जोगेश्वरी परिसरात घडली. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी भाऊ दिपक राघोजी सावंत याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना मंगळवारी २३ एप्रिलला सकाळी दहा ते सव्वादहाच्या सुमारास जोगेश्वरीतील गांधीनगर, शितलादेवी मंदिराजवळ घडली. दिपक हा त्याची आई, भाऊ आणि बहिणीसोबत याच परिसरात हडकर चाळीत राहतो. काही दिवसांपूर्वी त्यांची चाळ पुर्नविकासाठी गेली होती. चाळ तोडून तिथे एसआरएची एक बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरु होणार होते. मात्र या पुर्नविकासाला सुबोधचा विरोध होता. त्यामुळे त्याने रुम खाली करण्यास नकार दिला होता. याच कारणावरुन सुबोध आणि दिपक यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होता. याच कारणावरुन मंगळवारी सकाळी सुबोध आणि दिपक यांच्यात वाद झाला होता. त्यातून रागाच्या भरात दिपकने सुबोधला कुठल्या तरी जड वस्तूने मारहाण केली होती. त्यात सुबोध हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला तातडीने जवळच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंदर यांच्यासह मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी दिपकची बहिण सुरेखा राघोजी सावंत हिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या जबानीनंतर पोलिसांनी दिपकविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा ठुले या करत आहेत.