मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मार्च २०२४
मुुंबई, – सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळ झालेल्या फायरिंग कटाचा मुख्य सूत्रधार अनमोल बिष्णोई असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. अनमोल हा विदेशात वास्तव्यास असल्याने त्याच्याविरुद्ध केंद्रीय गृहविभागाच्या मदतीने गुन्हे शाखेने लुक आऊट नोटीस जारी केली आहे. दुसरीकडे साबरमती जेलमध्ये असलेल गॅगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचाही लवकरच गुन्हे शाखेकडून ताबा घेतला जाणार आहे. त्यानेच अनमोलच्या मदतीने या संपूर्ण कटाची आखणी केल्याचे बोलले जाते.
सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ फायरिंग झाल्यानंतर काही तासांत अनमोलने विदेशात एक पोस्ट व्हायरल केली होती. या पोस्टच्या माध्यमातून त्याने सलमालच्या घराजवळील झालेल्या फायरिंगची जबाबदारी घेतली होती. ज्या ठिकाणाहून ही पोस्ट व्हायरल झाली होती, त्याचा आयपी ऍड्रेस कॅनडाचा होता. या फायरिंगनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पंजाब आणि सुरतच्या भूज येथून चार आरोपींना अटक केली असून त्यात दोन शूटरसह त्यांना शस्त्रे देणार्या दोघांचा समावेश आहे. या चौघांच्या चौकशीतून अनमोल बिष्णोई हाच या कटातील मुख्य मास्तरमाईंड असून त्याचा या कटातील सहभागाचे काही भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती सापडले आहे. अनमोल हा सध्या विदेशात राहत असून विदेशातून तो त्यांच्या सहकार्यांना आदेश देत आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी गुन्हे शाखेने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलिसांनी केंद्रीय गृहविभागाला पत्रव्यवहार करुन त्याच्या अटकेसाठी लुक आऊट नोटीस जारी करण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य करुन त्याच्याविरुद्ध आता पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केले आहे.