मुलाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या दागिन्यांवर कर्ज काढून फसवणुक
महिलेच्या तक्रारीवरुन पती-पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मार्च २०२४
मुंबई, – मुलाच्या शाळेच्या प्रवेशासाठी घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज काढून एका महिलेची फसवणुक झाल्याचा प्रकार वरळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुक करणार्या पती-पत्नीविरुद्ध वरळी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. प्रयाग जनार्दन पवार आणि प्रांजल प्रयाग पवार अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
५२ वर्षांची तक्रारदार महिला ही वरळी येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तिच्या पतीचा प्रयाग हा मित्र असून तो वरळीतील बीडीडी चाळीत राहतो. कौटुंबिक संबंध असल्याने दोन्ही कुटुंबिय नेहमी एकमेकांच्या घरी येत-जात होते. कोरोना काळात आर्थिक परिस्थितीमुळे प्रयाग आणि प्रांजलला त्याच्या मुलाच्या प्रवेशासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे तिचे काही दागिने मागितले होते. या दागिन्यांवर कर्ज घेऊन मुलाचे ऍडमिशन करुन आणि नंतर थोड थोड पैसे बँकेत जमा करुन दागिने परत करण्याचे आश्वासन दिले होते. तिने तिच्या पतीकडे विचारणा करुन त्यांना तिचे ७२ ग्रॅम वजनाचे ४ लाख ३० हजार रुपयांचे दागिने दिले होते. या दागिन्यांवर पवार कुटुंबियांनी कर्ज घेतले होते. दोन महिन्यांत दागिने परत करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी दागिने परत केले नाही.
सतत विचारणा करुनही त्यांच्याकडून तिला काही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तिने बँकेत जाऊन विचारपूस केली असता प्रयाग आणि प्रांजलने दागिन्यांवर दोन वेळा २ लाख ६० हजार रुपयांचे गोल्ड लोन घेतले होते. मात्र कर्जाची परतफेडी केली नसल्याचे समजले होते. अशा प्रकारे मुलाच्या शाळेच्या प्रवेशासाठी घेतलेल्या दागिन्यांवर कर्ज काढून या दोघांनी दागिन्यांचा अपहार करुन तिची फसवणुक केली होती. या प्रकारानंतर तिने वरळी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर प्रयाग पवार आणि प्रांजल पवार या दोघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या आरोपी पती-पत्नीची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.