भाड्याने घेतलेला फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर देऊन फसवणुक
अशा प्रकारे गंडा घालणार्या रेकॉर्डवरील आरोपी महिलेस अटक
अरुण सावरटकर
२७ जुलै २०२६
मुंबई, – भाड्याने घेतलेल्या फ्लॅट परस्पर दुसर्या महिलेला हेव्ही डिपॉझिटवर देऊन फ्लॅटमालकाची फसवणुक करणार्या रुबीना मेहबूब शेख या रेकॉर्डवरील सराईत आरोपी महिलेस खार पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत सुमय्या शेख वैद्य ही महिला सहआरोपी असून या दोघींनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्या सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही खार पोलीस ठाण्यात बोगस पॉवर ऑफ ऍटनीचे कागदपत्रे बनवून भाड्याने घेतलेला फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर देऊन फ्लॅटमालकाची फसवणुक केल्याचा आरोप आहे.
गौतम वासुदेव बजाज हे व्यावसायिक असून ते त्यांच्या आई आणि भावासोबत वांद्रे परिसरात राहतात. हिल रोड, इल्को आर्किड येथे त्यांच्या मालकीचे मूर्ती आणि कपडे विक्रीचे नडअरिना नावाचे एक शॉप आहे. त्यांची प्रिती बजाज आणि भाऊ सत्यन बजाज यांच्या संयुक्त मालकीचे खार येथील पाचवा रोड, मोहीनी टॉवर अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावर ७०२ क्रमांकाचा एक फ्लॅट आहे. गेल्या बारा वर्षांपासून ते फ्लॅट भाड्याने देत आहेत. गेल्या वर्षी स्थानिक ब्रोकर समीर खान यांच्यामार्फत त्यांची रुबीना शेख या महिलेशी ओळख झाली होती. तिला भाड्याने फ्लॅटची गरज होती. त्यामुळे तिने त्यांना त्यांचा फ्लॅटभाड्याने देण्याची विनंती केली होती.
चर्चेअंती त्यांच्यात डिसेंबर २०२५ ते डिसेंबर २०२८ या तीन वर्षांसाठी भाडेकरार झाला होता. त्यापैकी पहिल्या वर्षांत एक लाख, दुसर्या वर्षांत एक लाख सात हजार आणि तिसर्या वर्षी एक लाख चौदा हजार रुपये भाडे तसेच चार लाख रुपये डिपॉझिट रक्कम देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे रुबीनाने त्यांना डिपॉझिट आणि मे महिन्यांपर्यंत भाडे दिले होते. काही महिन्यानंतर त्यांचा एक मित्र अलीने त्यांना रुबीनाने त्यांचा फ्लॅट दुसर्या व्यक्तीला हेव्ही डिपॉझिटवर दिले आहे. त्यामुळे त्यांनी रुबीनाकडे विचारणा केली असता तिने तिचे कुटुंब राहत असून तिने कोणालाही हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट दिला नाही असे सांगितले. त्यामुळे त्यांनी फ्लॅटविषयी चौकशी केली नाही.
मात्र जून महिन्यांत त्यांना रुबीनाकडून एक नोटीस आली होती. त्यात त्यांच्या मालकीच्या फ्लॅटचे पॉवर ऑफ ऍटर्नी रुबीना शेख हिच्या नावावर असून तिने तो फ्लॅट ६० महिन्यांसाठी हेव्ही डिपॉझिटवर सुमय्या शेख या महिलेस दिल्याचे नमूद केले होते. त्यासाठी तिने सुमय्याकडून ३२ लाख रुपये हेव्ही डिपॉझिट घेतले होते. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. त्यांनी तिच्याकडे पॉवर ऑफ ऍटर्नीच्या कागदपत्रांची मागणी केली असता तिने तिचा भाऊ सत्यन याच्या बोगस नावाने आधारकार्ड, पॅनकार्ड, त्यांच्या नावाच्या जागी दुसर्याचा फोटो वापरुन, त्यांची बोगस स्वाक्षरी केल्याचे दिसून आले. त्यात त्यांचे नाव, राहण्याचा पत्ता चुकीचा होता. एकूणच ती पॉवर ऑफ ऍटर्नी बोगस असल्याचे दिसून आले.
चौकशीअंती रुबीना शेख आणि सुमय्या शेख यांनी अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याचे समजले. रुबीना ही भाड्याने फ्लॅट घेऊन तोच फ्लॅट दुसर्या व्यक्तीला हेव्ही डिपॉझिटवर देऊन फ्लॅटमालकाची फसवणुक करत होते. त्यांनी यापूर्वी शेरली राजन परिसरातील एका फ्लॅटमालकाची अशाच प्रकारे फसवणुक केली होती. याबाबत त्यांच्याविरुद्ध खार पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. हा प्रकार उघडकीस येताच गौतम बजाज यांनी खार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या दोन्ही महिलांविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रुबीना शेख आणि सुमय्या शेख या दोघींविरुद्ध पोलिसांनी बोगस पॉवर ऑफ ऍटर्नीचे कागदपत्रे बनवून भाड्याने घेतलेल्या फ्लॅट दुसर्याच व्यक्तीला हेव्ही डिपॉझिटवर देऊन फ्लॅटमालक असलेल्या गौतम बजाज यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच रुबीना शेख हिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत सुमय्या शेख हिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.