एसआरए-म्हाडाचा फ्लॅट देण्याच्या आमिषाने वयोवृद्ध महिलेची फसवणुक
३५ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी मुख्य आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – एसआरए-म्हाडाचे एजंट असल्याची बतावणी करुन धारावीतील एका निर्माणधीन एसआरए इमारतीमध्ये स्वस्तात रुम देण्याचे आमिष दाखवून एका वयोवृद्ध महिलेची सुमारे ३५ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी मुख्य आरोपीस धारावी पोलिसांनी अटक केली. मुर्गन अनबलगन पल्लन असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याला इतर दोघांनी मदत केली असून त्यांना सहआरोपी करण्यात आले आहे. राजेश पिल्लई आणि विनिता समाधान सुरवडे अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कलैयारासी बलराज नावाची ६२ वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार महिला ही धारावी येथे राहते. २००५ साली तिच्या पतीने धारावीतील एका निवासी इमारतीमध्ये फ्लॅट विकत घेतला होता. तो फ्लॅट तिने अस्लम नावाच्या एका व्यक्तीला दहा लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर दिला होता. त्यानंतर ते सर्वजण रायगड येथे राहण्यासाठी गेले होते. दिड वर्ष तिथे राहिल्यानंतर ते सर्वजण पुन्हा धारावी येथे आले होते. तिचे पती आजारी होते, तसेच मुलाला नवीन नोकरी लागली होती, हेव्ही डिपॉझिटची रक्कम देऊन फ्लॅटमध्ये राहणे तिला शक्य नव्हते. त्यामुळे तिने फ्लॅटची विक्रीचा निर्णय घेतला होता. अस्लमला दहा लाख रुपये देऊन उर्वरित पैशांतून दुसरे रुम घेण्याचा तिचा विचार होता. यावेळी तिला तिच्या परिचित मुर्गन पल्लनने एसआरए किंेवा म्हाडामध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते.
त्याच्यावर विश्वास ठेवून तिने तिच्या फ्लॅटची ४० लाखांमध्ये विक्री केली होती. अस्लमला दहा लाख रुपये दिल्यानंतर तिने दुसर्या फ्लॅटसाठी तीस लाख रुपये स्वतसाठी ठेवले होते. याच दरम्यान मुर्गन, राजेश पिल्लई आणि विनिता सुरवडे यांनी तिला त्यांचे म्हाडा आणि एसआरएमध्ये चांगली ओळख आहे. ते तिघेही म्हाडा आणि एसआरएमध्ये एजंट म्हणून काम करत असून त्यांनी आतापर्यंत अनेकांना स्वस्तात रुम घेऊन दिले आहे. मुर्गनवर विश्वास असल्याने तिने त्याला रुमसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. काही दिवसांनी त्यांनी तिला व्ही. के वाडीत सुरु असलेल्या आकाश टॉवर या एसआरए इमारतीची माहिती सांगून तिला तिथेच ३५ लाखांमध्ये फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते.
ठरल्याप्रमाणे तिने त्यांना टप्याटप्याने सुमारे ३५ लाख रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा कागदपत्रे दिले नव्हते. विचारणा केल्यांनतर ते तिघेही तिला टाळण्याचा प्रयत्न करत होते. या तिघांकडून फसवणुक होत असल्याने तिने त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली, मात्र त्यांनी तिला पैसे परत केले नाही. त्यामुळे तिने घडलेला प्रकार धारावी पोलिसांना सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मुर्गन पल्लन, राजेश पिल्लई आणि विनिता सुरवडे या तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच ते तिघेही पळून गेले होते. त्यामुळे त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या सात महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या मुर्गनला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने फसवणुकीच्या उद्देशानेच तक्रारदार महिलेला फ्लॅटचे आमिष दाखविल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.