टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बुधवारी दुपारी आठ आरोपींना मोक्का कोर्टात हजर करणार

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – सिनेअभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबारप्रकरणी मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर आली असून याच गुन्ह्यांत सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत आतापर्यंत अकरा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात तीन शूटरसह शस्त्रे पुरविणार्‍या दोन महिलांचा समावेश आहे. अकरापैकी आठ आरोपींना बुधवारी दुपारी मोक्का कोर्टात हजर करण्यात येणार आहे तर इतर तिन्ही शूटरला शनिवारी कोर्टात हजर केले जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. सलमान खान गोळीबारप्रकरण, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची हत्येनंतर टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी आरोपीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाल्याने लॉरेन्स बिष्णोई टोळीला जबरदस्त हादरा बसल्याचे बोलले जाते.

१८ ऑक्टोंबरला जुहू येथे सिनेअभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर बाईकवरुन तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर तिन्ही शूटर पळून गेले होते. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. हा तपास हाती घेताना मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीने गोळीबारातील तिन्ही शूटर फुलसिंह नरेशकुमार ऊर्फ फुली, रेहान रहिसुद्दीन अन्सारी ऊर्फ सुका, रितिक राम महतो यांना कोटा रेल्वे स्थानकातून अटक केली होती. ते तिघेही मुंबई-पुणे-राजस्थान-दिल्ली मार्गे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र नेपाळला जाण्यापूर्वीच या तिघांना पोलिसांनी अटक केली.

त्यांच्या चौकशीतून राधा सुनिल वर्मा, बबीता राजजतन राव, कुणाल संजयकुमार जमिनसिंग, सुमीत बिजेंदर सरोलिया या चौघांना दिल्ली आणि हरियाणा येथील सोनीपत येथून पोलिसांनी अटक केली होती. या चारही आरोपींना गोळीबाराच्या कटाची संपूर्ण माहिती होती. त्यांनी गोळीबारासाठी शस्त्रे पुरविली होती. सात आरोपींच्या अटकेने याच गुन्ह्यांत अंकित ऊर्फ सरपंच राजेश खटक, समीर हसन खत्री, जतीन क्रिशन पांचाळ या अन्य तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. गोळीबारानंतर अवघ्या काही तासांत मुंबई पोलिसांनी दिल्ली, इंदौर, राजस्थान पोलिसांच्या मदतीने आतापर्यंत अकरा आरोपींना अटक केली होती.

ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. मंगळवारी या गुन्ह्यांत मुंबई पोलिसांनी मोक्का लावला आहे. याच गुन्ह्यांत तिन्ही शूटर वगळता इतर आठ आरोपींना बुधवारी मोक्का कायद्यांतर्गत अटक करुन कोर्टात हजर केले जाणार आहे. इतर तिघांना शनिवारी मोक्का कोर्टात हजर केले जाणार आहे. या संपूर्ण कटाचा मास्टरमाईंड अनिल पंडित असल्याचे उघडकीस आल्याने त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page