सुरतच्या व्यावसायिकाची २७ लाखांची नोकराने पळविली
बोरिवलीतील घटना; नोकराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मार्च २०२४
मुंबई, – नवीन हॉटेलसाठी इंटेरियर डिझानिंग सामान खरेदीसाठी आलेल्या सुरतच्या व्यावसायिकाची सुमारे २७ लाखांची कॅश त्यांच्याच नोकराने पळविली. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस येताच या व्यावसायिकाने त्यांचा नोकर अरुणकुमार अकलेश राऊत याच्याविरुद्ध एमएचबी पोलिसांत चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या नोकराचा शोध सुरु केला आहे. आरोपी नोकर हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून तो त्याच्या गावी पळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच बिहारला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
चंद्रप्रकाश कालुराम व्यास हे व्यावसायिक असून ते त्यांच्या पत्नी अलका आणि नोकर अरुणकुमारसोबत सुरतच्या सिटीलाईट, ओरियाणा रेसीडेन्सी अपार्टमेंटमध्ये राहतात. अरुणकुमार हा मूळचा बिहारच्या मधुबनी, शिवहरचा रहिवाशी आहे. तिथेच त्यांचा मॅरेज हॉलचा व्यवसाय असून त्यांना सुरत येथे एक नवीन हॉटेल सुरु करायचे होते. त्यासाठी त्यांना इंटेरियर डिझायनिंगचे सामान खरेदी करायचे होते. त्यामुळे त्यांनी सुमारे २७ लाख रुपये बाजूला काढून ठेवले होते. मुंबईसह भिवंडी येथून ते सामान खरेदी करणार होते. अनेकदा ते मुंबईत कामानिमित्त येत असल्याने त्यांनी बोरिवलीतील योगीनगर, योगी पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. मुंबईत आल्यानंतर ते याच फ्लॅटमध्ये राहत होते. २४ एप्रिलला ते त्यांचा नोकर अरुणसोबत मुंबईत आले होते. योगीनगर येथील घरी आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील २७ लाखांची कॅश लॉकरमध्ये ठेवली होती.
दुसर्या दिवशी ते कामानिमित्त भिवंडी येथे गेले होते. यावेळी त्यांचा नोकर फ्लॅटमध्ये एकटाच होता. सायंकाळी चार वाजता ते घरी आले असता तिथे अरुणकुमार नव्हता. त्याचा मोबाईल बंद येत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी लॉकरमधील कॅशची पाहणी केली असता तिथे २७ लाखांची कॅश नव्हती. त्यांचा नोकर लॉकरमधून २७ लाखांची कॅश घेऊन पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी एमएचबी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अरुणकुमार राऊत याच्याविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अरुणकुमारविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.