मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मार्च २०२४
मुंबई, – महादेव बेटींग ऍपच्या गुन्ह्यांतील लायन बुकचा पार्टनर आणि सिनेअभिनेता साहिल जाहिद खान याला गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने छत्तीसगढ येथील एका हॉटेलमधून अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले असून याच गुन्ह्यांत त्याला भोईवाडा येथील लोकल कोर्टाने बुधवार १ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्यांनतर साहिल खान हा पळून गेला होता. गोवा, कनार्टक, गडचिरोली आणि नंतर छत्तीसगढ असा ४० तासांचा पाठलाग करुन त्याला अटक करण्यात यश या पथकाला यश आले आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महादेव ऍपच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात ऑनलाईन बेटींगसाठी काही बेटींग ऍपची निर्मिती करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांपासून ऍपच्या प्रमुखांनी सोशल मिडीयासह वेबसाईट आणि वेबपोर्टलद्वारे या ऍपची माहिती देऊन क्रिकेट, फुटबॉल, टेनीस, कॅसिनो, तीनपत्ती या खेळांवर ऑनलाईन बेटींग घेण्यास अनेकांना प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केली होती. ही रक्कम काही बेनामी खात्यात जमा केली जात होती. हा पैसा भारतासह विदेशातील हॉटेल आणि विविध व्यवसायात गुंतविण्यात आला होता. ऑनलाईन जुगार खेळताना कोणताही कर न करता या ऍपच्या माध्यमातून पंधरा हजार कोटीची फसवणुक केली होती. अशा प्रकारे या ऍपच्या माध्यमातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडविण्यात आला होता. हा प्रकार उघडकीस येताच माटुंगा पोलिसांनी ऍपशी संबंधित ३२ आरोपींविरुद्ध भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात येताच वरिष्ठांनी गुन्ह्यांच्या तपासकामी एका विशेष पथकाची नियुक्ती केली होती.
चौकशीदरम्यान साहिल खान याचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याची पोलिसांनी चौकशी केली होती. त्याची जबानी नोंदवून नंतर त्याला सोडून देण्यात आले होते. या चौकशीत त्याने लायन बुक ऍपचे प्रमोशन करुन त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या इव्हेंटला उपस्थिती लावली होती. लायन बुक ऍपनंतर लोटस बुक २४/७ नावाचे दुसरे ऍप सुरु करण्यात आले होते. या ऍपच्या प्रमोशनसाठी दुबईमध्ये मोठ्या प्रमाणात पार्ट्या आयोजित करण्यात आले होते. त्यात बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटीसह नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. अटकेच्या भीतीने साहिलने कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा हा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला होता. त्यानंतर बुधवार २४ एप्रिलपासून अटकेच्या भीतीने साहिल खान हा अचानक गायब झाला होता. स्वतचे अस्तिस्व लपवून खाजगी वाहनाने त्याने पलायन केले होते. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
मुंबईतून पळून गेल्यानंतर तो गोवा येथे गेला. तिथे राहिल्यानंतर तो कर्नाटक, गडचिरोलीमार्गे छत्तीसगढला गेला होता. तिथे तो एका हॉटेलमध्ये राहत होता. गोव्यापासून त्याचा विशेष पथकातील अधिकारी पाठलाग करत होते. याच दरम्यान तो छत्तीसगढ येथे गेल्याची माहिती प्राप्त होताच या पथकाने तेथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या साहिल खानला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याच्यावर नंतर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला बुधवार १ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल अहो. त्याच्याकडून पोलिसांनी दोन मोबाईल जप्त केले आहे. ते दोन्ही मोबाईल तपासणीसाठी फॉन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. या मोबाईलमधून साहिल हा कोणाच्या संपर्कात होता, त्याला किती पैसे मिळाले होते. या पैशांचे त्याने काय केले याचा तपास सुरु आहे. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. सत्य लवकरच सर्वांसमोर येईल, माझा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे असे त्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
साहिल खान हा सिनेअभिनेता असून त्याने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. यातील काही चित्रपट चांगले चालले तर काही फ्लॉप ठरले होते. त्यामुळे त्याने स्वतच्या फिटनेसवर भर देण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान त्याने स्वतची न्यूटीशियन कंपनी सुरु केली होती. त्यानंतर तो महादेव ऍप कंपनीशी जोडला गेला. त्यातील एका ऍपचा तो पार्टनर म्हणून काम पाहत होता. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून त्याच्या इतर सहकार्यांची माहिती काढण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, विशाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रादेशिक सायबर सेल विभागाच्या प्रभारी पोलीस निरीक्षक मौसमी पाटील, पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, अरुण थोरात, प्रविण मोहिते, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवळी, पोलीस हवालदार अशोक शिंदे, सचिन ननावरे, मयुर थोरात, सहाय्यक फौजदार चालक पासी, पोलीस हवालदार चालक जगदाळे, शुक्ला यांनी पार पाडली.