मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मार्च २०२४
मुंबई, – कर्जाच्या नावाने एका ५१ वर्षांच्या महिलेची ऑनलाईन फसवणुक कटातील एका वॉण्टेड आरोपीस एमएचबी पोलिसांनी अटक केली. गिरीश शंकर फडतरे असे या ३३ वर्षीय आरोपीचे नाव असून तो दिवाचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने मंगळवार ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत वरुण सावंत ऊर्फ साधन चक्रवर्ती आणि श्रीकांत चव्हाण या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
यातील तक्रारदार महिला ही बोरिवली परिसरात राहते. २२ फेब्रुवारी २०२४ रोजी ती तिच्या घरी होती. यावेळी तिला वरुण सावंत नाव सांगणार्या एका व्यक्तीने फोन केला होता. त्याने तो एका खाजगी बॅकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तिला कर्जाविषयी कर्जाविषयी विचारणा केली होती. तिला कर्जाची गरज असल्याने तिने त्यास होकार दिला होता. त्यानंतर वरुणसह त्याचे दोन सहकारी श्रीकांत चव्हाण आणि गिरीश फडतरे यांनी कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देऊन २२ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत तिच्याकडून ३१ हजार ८१० रुपये घेतले होते, मात्र तिला कर्ज न देता तिची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत एमएचबी पोलीस ठाण्याच्या सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर, पोलीस निरीक्षक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश किरपेकर, पोलीस हवालदार रवी पाटील, जोपळे, महिला पोलीस शिपाई इलग, पोलीस शिपाई राणे यांनी तपास सुरु केला होता. ज्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली होती, त्या बँक खात्याची माहिती काढण्यात आले होते. तसेच आरोपींच्या मोबाईल क्रमाकाचे सीडीआर काढून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस उपनिरीक्षक मंगेश किरपेकर, पोलीस हवालदार रवी पाटील, जोपळे, इलग, राणे यांनी बोरिवली येथे आलेल्या गिरीश फडतरे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल, दोन सिमकार्ड, दोन डेबीट कार्ड पोलिसांनी जप्त केले आहे. याच गुन्ह्यांत त्याला रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. गिरीश व त्याच्या दोन सहकार्यांनी अशा प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्याच्याकडून फसवणुक झालेल्या पैशांबाबत माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.