एकाच कुटुंबातील पाच बांगलादेशी नागरिकांना अटक

कांदिवलीतील इस्लाम कंपाऊंडमध्ये एटीएसची कारवाई

0

बई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मार्च २०२४
मुंबई, – एकाच कुटुंबातील पाच बांगलादेशी नागरिकांना कांदिवलीतील एटीएसच्या अधिकार्‍यांनी इस्लाम कंपाऊंड परिसरातून अटक केली. मोहम्मद हबीबुर रेहमान अन्वरअली प्रधानिया ऊर्फ शेख, फातिमा खातून मोहम्मद हबीबूर रेहमान अन्वरअली प्रधानिया ऊर्फ शेख, हबीबुर रेहमान प्रधानिया ऊर्फ शेख, अल्लाउद्दीन हबीबुर रेहमान प्रधानिया ऊर्फ शेख आणि सल्लाउद्दीन हबीबुर रेहमान प्रधानिया ऊर्फ शेख अशी या पाचजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील वयोवृद्ध मोहम्मद हबीबुर हा गेल्या ४४, त्याची पत्नी फातिमा खातून १५ तर तिन्ही मुले हबीबुर, सल्लाउद्दीन आणि अल्लाउद्दीन हे १७ वर्षांपासून मुंबई शहरात वास्तव्यास असल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश घाडगे यांनी सांगितले.

  

कांदिवलीतील एम. जी रोड, क्रोम शॉपिंग शॉपिंग सेंटरजवळील इस्लाम कंपाऊंड परिसरात काही बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रकाश घाडगे यांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे यांनी एटीएस पथकाने संबंधित बांगलादेशी नागरिकांवर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे यांच्या एटीएस पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश घाडगे, पोलीस हवालदार शरद गावकर, शिवाजी नारनवर, पोलीस शिपाई सचिन दिसले, प्रशांत कुंभार, योगेश हिरेमठ, महिला पोलीस हवालदार कपिला बेहूर यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून ६१ वर्षांच्या मोहम्मद हबीबुर याच्यासह त्याची पत्नी फातिमा खातून, तीन मुले हबीबुर, सल्लाउद्दीन आणि अल्लाउद्दीन अशा पाचजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याच्या पुरावाबाबत विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी करण्यात आली होती.

चौकशीदरम्यान त्यांनी ते सर्वजण बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. प्रधानिया ऊर्फ शेख कुटुंबिय मूळचे बांगादेशातील जेसोर, बसतपूरच पहिली कॉलनी, पश्‍चिम पाराचे रहिवाशी आहेत. बांगलादेशातील उपासमारी आणि बेरोजगारी कंटाळून १९८० साली मोहम्मद हबीबुर हा बांगलादेशातून मुंबईत नोकरीसाठी आला होता. तेव्हापासून तो कांदिवलीतील लालजीपाडा आणि नालासोपारा येथे वास्तव्यास होता. २००७ साली तो बांगलादेशात गेला होता. त्यानंतर तो त्याच्या तिन्ही मुलांसोबत मुंबईत आला होता. २००९ साली त्याची पत्नी फातिमा खातून ही बांगलादेशातून मुंबईत राहण्यासाठी आली होती. गेल्या सात वर्षांपासून ते मालाडच्या मालवणी परिसरात राहत होते. त्यानंतर तीन महिन्यांपासून ते सर्वजण कांदिवलीतील एम. जी रोड, इस्लाम कंपाऊंडमध्ये राहण्यासाठी आले होते. तिथे त्यांनी एक घर ४० हजार डिपॉझिट आणि आठ हजार रुपयांच्या भाड्यावर घेतले होते. मोहम्मद हबीबुर आणि फातिमा खातून हे दोघेही बिगारी कामगार तसेच कचरा वेचण्याचे काम करतात तर त्याचे तिन्ही मुले विविध बांधकाम साईटवर मिस्त्री, प्लबंर आणि कडियाकाम करत असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून पोलिसांनी पाचहून अधिक मोबाईल जप्त केले असून या मोबाईलची पाहणी केली असता ते सर्वजण आयएमओ ऍपच्या माध्यमातून त्यांच्या नातेवाईक, मित्रांच्या संपर्कात होते. त्यांच्या मोबाईलमध्ये काही मॅसेज, चॅट, व्हिडीओ कॉलिंग केल्याचे दिसून आले.

ते सर्वजण बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस येताच त्यांच्याविरुद्ध विदेशी व्यक्ती आणि पारपत्र अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर पाचही आरोपींना रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना मंगळवार ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश घाडगे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page